Tuesday, 13 February 2018

ज्ञानेंद्रिये व संबंधित द्रव्ये (Sense organs and substances they detect)

मानवी शरीर म्हणजे निसर्गाची जणू प्रयोगशाळाच. निसर्गाच्या या प्रयोगशाळेतील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन व आत्मा ही साहीच्या साही या शरीरात हजर असतात. तेही वेगवेगळ्या स्वरूपात, शरीरातली हाडे स्थायुरूप, रक्त, विकरे द्रवरूप, प्राण-अपान-उदान-समान इत्यादि वायू, जठरातला जठराग्नी, डोळ्यातला प्रकाश हे तेजद्रव्याचे प्रकार. यानंतर परा,वाचा, वैखरी हे वाणीचे म्हणजे आकाशद्रव्याचे प्रकार, शरीरातल्या अगणित-अब्जावधी पेशींना प्रत्येकीला एकेक मन(संदर्भ: स्वामी विज्ञानानंद – मनाची शक्ती) व आत्मा. म्हणजे ही द्रव्ये वैशेषिकात माणसाला स्वत:च्या शरीरावरूनच सुचलेली असतील काय असा विचार करत विक्रम चालला होता.

“विक्रमा, मी बघतोय, दर वेळेला तू काही वेगळ्याच विश्वात असतोस..कधी मासेमारी, कधी लहानग्यांचे खेळ, कधी जीवशास्त्र आणि आता तर माणसाच्या शरीरात घुसलास..मी दर अमावस्येला प्रेतात घुसतो तसा..”

“अरे मी भूतगुणांचा म्हणजे हाडामासाचा आहे वेताळा..मी कसा दुसऱ्यात जाईन?”

“हे तू मला सांगतोस? असो. पण मला हे सांग विक्रमा की मानवांच्या शरीरात सारी नव द्रव्ये असतात. दिक् व काल ही नैमित्तिक सोडली व मन-आत्मा ही अमूर्त द्रव्ये सोडली तरी वैशेषिकात म्हटलेली ही पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही द्रव्ये माणसाचं शरीर कसं जाणतं? मला प्रशस्तपादांचं म्हणणं सांग..नाहीतर लागशील माणसांची स्तुती करायला..”

“वेताळा, प्रशस्तपादांनी म्हटलंय..
पृथिव्यादीनां पञ्चानामपि भूतत्वेन्द्रियप्रकृतित्वबाह्यैकैकेन्द्रियग्राह्यविशेषगुणवत्वानि ||25||
 To the five beginning with Earth, belong to the characters of –being material, being the main material principle of the sense organs, and being endowed with such specific qualities as are each perceptible by each of the external organs of perception.
पृथ्वी, आप, तेज, वायू, व आकाश यांचे गुण म्हणजे – त्यांना मूर्तरूप असते व त्यांना जाणून घेण्याच्या एकेक ज्ञानेंद्रियांमधील ती मुख्य द्रव्ये असतात.

“जाणून घ्यायची ज्ञानेंद्रिये म्हणजे?”

“वेताळा त्वचेमध्ये पृथ्वीद्रव्य जाणून घेण्याची क्षमता असते, जीभेमध्ये आप, डोळ्यात तेज, नाकामध्ये वायू, व कानात आकाशद्रव्य जाणण्याची मुख्य क्षमता असते.”

“अरे, एका ज्ञानेंद्रियाला एकच द्रव्य कळतं? आणि जरा श्लोकांचे पुरावे दे..”

स्पर्शेंद्रिय

“नाही, एका ज्ञानेंद्रियाला एक द्रव्य कळतं असं म्हटलेलं नाही. गुणपदार्थनिरूपण या धड्यात प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय
स्पर्शस्त्वगिन्द्रियग्राह्य: |
क्षित्युदकज्वलनपवनवृत्ति: त्वक् सहकारिरूपानुविधायी शीतोष्ण अनुष्णशीत भेदात् त्रिविध: |
म्हणजे त्वचा हे स्पर्शेंद्रिय आहे. पृथ्वी(solid), उदक(liquid), ज्वलन(energy/heat) व पवन(gas) हे जेव्हा त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचे तीन प्रकारचे स्पर्श जाणवतात: शीतोष्ण – थंड(cold) व गरम(hot), पाकज अनुष्णशीत(pain) व अपाकज अनुष्णशीत (pressure). या त्वचेचे पृथ्वी हे मुख्यद्रव्य असून त्वचेच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या स्थायूपदार्थाचा ‘स्थायुपणा(solid)’ जाणण्याचे त्वचा हे मुख्य इंद्रिय आहे. शिवाय त्वचेमुळे उष्णता, थंडपणा यांच्या आधारे तेजद्रव्याची वा उष्णतेची जाणीव होते.”



“पण उष्णता म्हणजे तेज ना? तेज तर प्रकाशाच्या रूपातही प्रकटतं असं तू म्हणाला होतास..”

डोळे

“हो प्रकाशरूप तेज(energy as light) द्रव्याला जाणून घेण्यासाठी डोळ्याची गरज पडते. त्याविषयी कणादांच्या वैशेषिकसूत्रांमध्ये म्हटलंय
तत्ररूपं चक्षुर्ग्राह्यं |
पृथिव्युदकज्वलन वृत्तिद्रव्याद्युपलम्भकं नयनसहकारिरूपं द्विविधं – भास्वरम् अभास्वरम् च |
आद्यं तेजस: द्वितीयं स्वच्छम् अस्वच्छम् च, आद्यं उदकस्य, द्वितीयं पृथिव्या:
तेन भास्वरत्वस्वच्छत्वरहितरूपवती पृथिवी इति लक्षणम्|
शुक्लाद्यनेकप्रकारं तदपि सप्तविधं शुक्लं कृष्णं नीलं हरितं पीतं लोहितं चित्रं चेति ||‌”
Vision, a property perceived by eyes is inherited by solids, liquids, and radiant sources. These objects are accessible through eyes and are of two kinds - luminous and non-luminous. The radiant sources are luminous and the non-luminous objects are further divided into two: translucent and opaque. The liquids are of the first types viz. translucent while the solids are of the second type viz. opaque. That too is of seven colours viz. white, blue, cyan, green, yellow, red and magenta. ( Kanada’s science of Physics – NG Dongre and SG Nene)
वस्तूचे रूप दिसण्यासाठी आपल्याला डोळ्यांची गरज असते. या वस्तू स्थायु, द्रव किंवा तेज या असतात. या वस्तु डोळ्यांनीच दिसतात व त्यांचे दोन प्रकार आहेत – तेजस्वी आणि निस्तेज. तेजद्रव्यांनी बनलेली द्रव्ये तेजस्वी असतात व निस्तेज वस्तूंचे दोन प्रकार आहेत: अर्ध वा अंशत: पारदर्शक व अपारदर्शक. द्रव हे पहिल्या प्रकारात म्हणजे अर्ध किंवा अंशपारदर्शक असतात आणि स्थायु हे अपारदर्शक असतात. त्यांचेही सात रंग असतात: पांढरा, काळा, निळा, हिरवा, पिवळा, लाल व किरमिजी(magenta).”  



“अरे काय हे? उर्जा काय..त्यातून प्रकाश काय मग त्यातून रंग काय? प्रकाशातून हे प्रकरण रंगांकडे कसं वळलं हे मी विचारणारच आहे. पण आता मला चवी विषयी सांग..”

जीभ

“चवीला जाणून घेण्यासाठी किंवा रसाचा/द्रवाचा(liquid) स्वाद घेण्यासाठी जिभेची गरज पडते.
रसो रसनाग्राह्य: |
पृथिव्युदकर्जीवनवृत्तिपुष्टिव्रणारोग्यनिमित्ते रसनसहकारी मधुर-आम्ल-लवण-तिक्त-कटु-कषायभेदभिन्न: |
Taste is perceived by tongue. It is inherited by solid and liquid. It is for existence, nourishment, strength and healthiness. This may be classified as sweet, sour, saline, bitter, hot (burning taste) and stringent. ( Kanada’s science of Physics – NG Dongre and SG Nene).
चव ही जिभेने जाणता येते. चव ही स्थायु व द्रवांना असते. चव ही जिवंत राहण्यासाठी, पोषणासाठी, ताकदीसाठी व आरोग्यासाठी आवश्यक आहे. चवीचे गोड, आंबट, खारट, कडू, तिखटजाळ व तुरट हे प्रकार आहेत.”  

“बर..हे तर सोपंय..म्हणजे केवळ द्रवांनाच चव असते?”

“नाही वेताळा, प्रशस्तपादांनी म्हटलंय की
द्वयोर्गुरुत्वं रसवत्वञ्च ||28||
To the two, the character of having gravity and taste.
पृथ्वी व आप यांना गुरुत्त्व असते व चव असते.”



“अच्छा, स्थायू व द्रव यांना चव असते शिवाय जडपणासुद्धा असतो. असो गुरुत्त्व हा जरा मोठा विषय वाटतो..मी अधिक गुरुत्त्वाविषयी विचारलं की तू खूप बोलशील हा वास मला लागलाच आहे. त्यापेक्षा मला वासा विषयी सांग..”'

“वास तसेच वायू(gas) जाणून घेण्यासाठी नाकाची गरज पडते. प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय..
गन्धो घ्राणग्राह्य: |
पृथिवीवृत्तीघ्राणसहकारी सुरभि: असुरभिश्च |
“Smell is sensed by nose. This property is inherited by solids. It is of two types: disagreeable and agreeable. ( Kanada’s science of Physics – NG Dongre and SG Nene)
वास हा नाकाने घेतला जातो. वास हा स्थायूंना असतो. वासाचे दोन प्रकार आहेत – हवासा वास व नकोसा वास.”



“अरेच्चा..मला वाटलं हवेचा वास असतो..”

“वेताळा, प्रशस्तपादांच्या म्हणण्यानुसार वास हा हवेबरोबर येणाऱ्या स्थायूंच्या सूक्ष्मांशाचा असतो..वाहक हवाच असते..”

“बर बर..त्वचा, डोळे, जीभ, नाक झाले..आता कानाविषयी सांग..”

कान

“आकाशाचा(plasma) गुण तरंग. ध्वनितरंगांना जाणण्यासाठी कानाची गरज पडते. प्रशस्तपादांनी म्हटलंय
शब्दोऽम्बरगुण:, श्रोत्रग्राह्य: |
क्षणिक: कार्यकारणोभयविरोधी, संयोगविभागशब्दज:, प्रदेशवृत्ति: समानासमानजातीयकारण: |
स द्विविधो वर्णलक्षणो ध्वनिलक्षणश्च | तत्र आकारादिर्वर्णलक्षण:, शंखानिमित्तो ध्वनिलक्षणश्च|
“Wave is the specific property of Plasma (fourth state of matter). It is perceivable by ear, the organ of hearing. It is temporal and in opposition to cause and action. Conjunctions and disjunctions (periodically) are due to wave. Wave propagates through space. A form of wave generates similar waves. These (acoustical sounds) are of two type viz. speech characters and pitch. Alphabets are of character type while sounds of conch etc. are of pitch type. ( Kanada’s science of Physics – NG Dongre and SG Nene)
तरंग हा आकाशद्रव्याचा विशेष गुण. त्याची जाणीव ऐकण्याच्या इंद्रियांना म्हणजेच कानांना होते. तरंग हे क्षणिक असतात व त्यांना निर्माण करणाऱ्या कारणांनी व परिणामांनी ते नष्ट होऊ शकतात. वारंवार होणारे आकुंचन व प्रसरण हे तरंगांमुळेच होते. तरंगाला जाण्यासाठी माध्यमाची गरज असते. तरंगांचा एक प्रकार त्याच प्रकारचे दुसरे तरंग तयार करतो. ह्या ध्वनितरंगांचे दोन प्रकार असतात.. वर्ण व ध्वनि. अ,आ,इ हे वर्ण आहेत व शंखातून येणारा आवाज हा ध्वनि आहे.



“वा रे विक्रमा किती व काय काय सांगितलंय प्रशस्तपादांनी..”

“हो वेताळा..पाच भूतद्रव्ये, त्यानंतर काल-दिक् व मन-आत्मा यानंतर सांगितल्यानंतर धड्याच्या शेवटी ते आवर्जून म्हणतात..
एवं सर्वत्र साधर्म्यं विपर्य्ययाद्वैधर्म्यञ्च वाच्यमिति द्रव्यासङकर:||34||
In this way we may describe the similarities of all things, and contrariwise, also their dissimilarities; and thus there would be no intermixture (or confusion) among the various substances.
अशाप्रकारे सर्व पदार्थांच्या सहा अंगांच्या तसेच नऊ घटकद्रव्यांच्या बाबतीतल्या सारखेपणा व वेगळेपणची चर्चा केली. या द्वारे त्या पदार्थांना व द्रव्यांना समजून घेण्याच्या संदर्भात काहीही गोंधळ होणार नाही. शेवटी कसंय की पाच द्रव्ये जरी कळली तरीही त्या पाच द्रव्यांनी बनलेला पदार्थ ओळखताना माणसाची बुद्धी सगळ्याची सांगड घालते, पूर्वस्मृतीतल्या आठवणीच्या फायली तपासून बघते व त्या पदार्थाची एकूण ओळख पटवून देते..बुद्धी आहे म्हणून बरं..नाहीतर हत्ती व सात आन्धळे यांच्या गोष्टीसारखी माणसाची गत होत राहिली असती..”



“वा विक्रमा, आचार्यांनी एवढं सांगितलं व समजण्यात गोंधळ होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली म्हणजे त्यांना बहुतेक खात्रीच आहे की शिष्यांचे अनेक प्रश्न आता निर्माण होणार आहेत. माझ्याही मनात अनेक प्रश्नांनी घिरट्या घालायला सुरुवात केली आहे. पण आता वेळ झाली आहे पुन्हा परत जायची..या मृत शरीराला जागेवर पुन्हा ठेवायची..येतो विक्रमा..पुन्हा कधीतरी असाच..पाच इंद्रियांविषयी अधिक माहिती घ्यायला..”

गोष्ट माणसाच्या पाच इंद्रियांची असली तरी सर्वच प्राण्यांना त्याचं गमक कळलं. निशाचर प्राण्यांना रात्रीचं दिसतं म्हणून ते शेफारले. मगरीच्या तोंडाला पाणी सुटले. वासावरचे नरभक्षक माणूस सापडतोय का याचा वास घेऊ लागले...वटवाघळांना तर भारीच आनंद झाला..त्यांना ऐकू येणारे आवाज माणसालाही कळत नसल्याने त्यांना स्वत:च्या कानांचा भारीच अभिमान वाटू लागला व ती उलटी लटकून झोके घेऊ लागली.

(क्रमश:)

मूळ कथा : विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

No comments:

Post a Comment