Friday, 24 November 2017

वैशेषिक विज्ञानाचा अभ्यास आता काय कामाचा? (Relevance of Vaisheshik physics in the modern times)

राजा विक्रम जसा एक निपूण नेता होता तसेच त्याला इतिहासातही विशेष रुची होती. विविध विद्याशाखा व कलाशाखाही त्याला ज्ञात होत्या. त्याच्या दरबारीही त्याने विविध शास्त्रांमधील, कलांमधील, विद्याशाखांमधील अनेक गाढे अभ्यासक व तंत्रसिद्ध-तंत्र पारंगत कारागीर निवडून निवडून आपल्या पदरी ठेवले होते. खासकरून पदार्थविज्ञानातील अभ्यासकही त्याच्या दरबारी होते. त्यांना तर त्याने राजगुरूंच्या शेजारचे स्थान दिले होते. त्याच्या दारबारातले विज्ञानगुरुंचे स्थान अतिशय महत्वाचे होते.

“हेच तर मी म्हणतो विक्रमा..”वेताळच तो, विक्रमाचा वेताळगुरु म्हणा हवं तर. विक्रमाच्या मजबूत खांद्यांवर व त्याच्या मनाच्या तरंगांवर स्वार होत तो म्हणाला, “तुझ्या दरबारात युद्धनिष्णात युद्धगुरू समजू शकतो, धर्मनिष्णात धर्मगुरू समजू शकतो, अध्यात्मगुरु समजू शकतो. पण विज्ञानगुरू? ही काय भानगड आहे बुवा?”
“वेताळा, तुला वाटतं तसं विज्ञान हे एक शास्त्र नाही, तर गणित, पदार्थविज्ञान, खगोलविज्ञान, भूमिती, त्रिकोणमिती, संख्याशास्त्र असे अनेक प्रवाह उपप्रवाह त्यात असतात.”

“अरे विक्रमा, एवढी शास्त्र एकत्र? त्याचा काय उपयोग? आणि विज्ञान गणित एकत्र? कसं शक्य आहे?”

“थोडं साहित्यिकासारखं बोलायचं झाल्यास गणित हीच विज्ञानाची व्यक्त होण्याची भाषा आहे. अनेक जटिल प्रयोगांच्या अंती मिळालेली सूत्रे ही दिसायला अतिशय सोपी असतात. उदाहरणार्थ भास्कराचार्यांनी समीकरण खालील प्रमाणे लिहिले:
व्यैकपदघ्नचयो मुखयुक्स्यादन्त्यधनम् |
फोड: व्यैकपदघ्न चय: मुखयुक्स्यात् अन्त्यधनम्

संस्कृत ही तर बोलून चालून सूत्रे लिहिण्याची भाषा. पहा या सूत्राच्या पोटात शिरून.
यात
मुख – first term – u,
अन्त्य – last term – v,
चय – बदल (change) – a,
पद – number of terms – t+1

अर्थात,  शेवटचे पद(अन्त्य) = (एकूण पदसंख्येतून(t+1) एक कमी करणे x समान बदल(a)) +  पहिले पद (u)
बीजगणितानंतर ती रोमन पद्धतीने लिहिण्याची पदधत रूढ झाली. हेच संस्कृत समीकरण रोमन चिन्हांद्वारे पुढीलप्रमाणे लिहितात. म्हणजेच
v = u + at

”अरेच्चा हे तर गतीचे समीकरण!”

“वेताळा, गणिताचे हे समीकरण गतीला लागू पडले म्हणून हे झाले गतीचे समीकरण..पण गतीशवाय हे अजून कशाकशाला लागू पडते हे पण पाहिले पाहिजे. शिवाय भास्कराचार्यांच्या लिलावतीमधली ही समीकरणे गतीला लागू पडली म्हणून ती गतीसमीकरणे झाली. पण लिलावतीमधली राहिलेली अनेक समीकरणे अजून कशाकशाला लागू पडतात हे पाहिले पाहिजे.”

“म्हणजे विक्रमा, तुझं म्हणणं आहे की नवीन जुन्या विचारप्रवाहांमधील केवळ साम्यस्थळेच पाहून चालणार नाही.”

“होय वेताळा, सगळंच जुनं हे टाकाऊ हे म्हणणं जसं चुकीचं तसं सगळं नवीन हे उपयोगी म्हणणं सुद्धा चुकीचं. आता दुसऱ्या ज्ञानशाखा पाहू. उपचारपद्धतींचे प्रकार पाहिले तर आयुर्वेदिक, होमिओपथी आणि ऍलोपथी या तीन आहेत. शिवाय नेचरोपथी व युनानी का काय ती पण आहे. या सगळ्या उपचारपद्धती या वेगवेगळ्या धाटणीच्या आहेत, त्यांचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे, निदान करण्याच्या, ओषधी तयार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत व त्यांची मात्रा लागू पडण्यासाठी चा काळ वेगवेगळा असू शकेल. पण त्या सर्वच आहेत मात्र रोग बरा करण्याच्या उद्देशाने बनलेल्या. त्यांच्यामार्फत रोग बरा झाला म्हणजे ती उपचारपद्धती कामाची.”

“हो पण याचा पदार्थविज्ञानाशी काय संबंध?”

“पदार्थविज्ञानातही वैशेषिक, युरोपियन अशा विविध विचारसरणी का असू नयेत? संगीतातही पौर्वात्य, पाश्चिमात्य अशा विचारसरणी आहेतच. त्या ज्यांना कळतात ते तसे संगीत बनतात, ते  ज्याना आवडतं ते ऐकतात. म्हणून ज्यांना पूर्वेकडचे संगीत समजात नाही, आवडत नाही, समजून घ्यायची इच्छा नाही त्यांनी ते संगीत टाकाऊ आहे असे म्हणावे का?”

“मला लक्षात येतंय तू काय म्हणतोयस ते..पण या वैशेषिक विज्ञानाचा अभ्यास करून आता काय उपयोग आहे? त्याची वाढ तर १२ च्या १३ व्या शतकात खुंटली. आता त्या शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?”

“वैशेषिक विचारसरणीचा उपयोग पुढे झाला नाही. त्यात वाढ झाली नाही, भर पडली नाही. कारणे काहीही असोत. पण ती भारतीय आहे. त्यात भारतीय मानसिकतेत विज्ञान नाही या खोट्या समजूतीला काढून टाकणारी प्रमेये आहेत. तर्कवाद आहेत. १५ व्या शतकात जसं युरोपमधल्या अभ्यासपद्धतीत भारतातल्या, इजिप्तमधल्या विचारप्रवाहांची सरमिसळ केली गेली व त्यातून युरोपियन विज्ञान सशक्त झाले तसे आता वैशेषिकात करण्याची गरज आहे.”

“मग विक्रमा हे वैशेषिकाचं सशक्तीकरण कसं करायचं?”

“यातील सारी प्रमेये एकतर आताच्या निकषांवर तपासून पाहावीत व त्यात आधुनिक संदर्भ आणावेत. वैशेषिक काय किंवा पाश्चिमात्य काय ते पदार्थ समजून घेण्याचे दोन दृष्टिकोन आहेत, पैकी वैशेषिकात स्थायू, द्रव, वायू, तेज ही भूतश्रेणीतील द्रव्ये म्हटलंय तर पाश्चिमात्यांनी स्थायू, द्रव, वायू यांना द्रव्याच्या अवस्था म्हटलंय. वैशेषिकात आकाश,काळ, स्थळ, मन व आत्मा यांनासुद्धा पंचमहाभूतांमधील द्रव्ये म्हटलंय तर पाश्चिमात्य स्थळ, काळ व निरीक्षकांना एकत्र  आणण्यासाठी संदर्भचौकट(frame of reference) ही संकल्पना वापरतात. आकाशाला इथर म्हणतात. मन व आत्मा हे तर विषय सुद्धा यात नव्हते. जसा जसा सापेक्षतावाद आला तसे अजडाला या शास्राच्या कक्षेत आणले गेले. जड व तेज यांचा परस्पर संबंध आइनस्टाईनच्या संशोधनातून प्रस्थापित झाला. प्रकाश, ध्वनी, रंग यांना तरंगांच्या स्वरूपात पाहिले जाते. वैशेषिकात तरंगासाठी ‘शब्द’ ही संकल्पना वापरली गेली आहे. हे तरंगरूप असणं हा आकाश या द्रव्याचा गुण म्हटलं गेलंय.”

“पण विक्रमा या वैशेषिकाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? असं काय आहे यात?”

“वेताळा, पाश्चिमात्य शास्त्रे ही जडवादाकडून निघाली व आता पुंजवाद तसेच अजडवादात शिरली..त्यांच्यातही अनेक वादविवाद दिसतात. जुने ग्रीक विचारवंत कार्यकारण भाव पक्षातले होते. नंतर जडवाद आला. आता अणुवाद आला. आता तिथेही देवाणू दिसायला लागला. खरंतर हा देवाणू वैशेषिकांनी सांगायला पाहिजे होता. कारण आत्मा हे सुद्धा वैशेषिक द्रव्य म्हटलं गेलंय. पण हे मात्र खरं की पाश्चिमात्यांनी त्यांच्या प्रयत्नात हे करुन पाहा ते करून पाहा असं करुन करुन बरीच सूत्रे व प्रमेये मांडली..पण एक विचार सरणी म्हणून पाश्चात्य पदार्थ विज्ञान काय सांगतं असं म्हटलं तर निश्चिती नाही. अनेक प्रयत्नवाद्यांनी विविध गोष्टी पाहताना व करून बघताना त्यांच्या दृष्टीला जे दिसलं, जे जाणवलं ते त्यांनी तर्कावर घासलं व पुराव्यांनी पडताळून पाहिलं तेव्हा जे दिसलं ते सत्य मानलं. यालाच साधारणपणे विवेकवादी Rational Thinking मानलं गेलं. स्थूल गोष्टींपर्यंत हे होतं तोपर्यंत सगळं आलबेल होतं. मोजमापेकरण्याच्या कामात यातून अनेक यंत्रं हाती लागली. तंत्रज्ञानं विकसित झाली.



पण जसं हे तारू सूक्ष्माकडे निघालं, मन-बुद्धी या गोष्टी त्यांनी कटाक्षाने पदार्थविज्ञानाच्या बाहेर ठेवल्या. जीवशास्त्राला कुंपणाबाहेर ठेवलं. (Mind Power – Swami Vijnananand). त्यामुळे झालं काय की पदार्थविज्ञानाचा वाढता परीघ अचानक कुंपणांमध्ये बांधला गेला. पदार्थविज्ञान जसं जसं विश्वाची उत्पत्ती, अजडाचा पसारा कवेत घेऊ लागलं तसं त्यातील कार्यकारणभाव, निर्मितीचे कारण अशी गृहितके कोसळू लागली.”

“अरे काय बोलतोस तू? तुला तरी कळते का? प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभाव असतोच असतो..हेच तर हे शिकवतं”

“ मान्य, एकदम मान्य. पण यात ते अजडाला स्थान द्यायला तयार नसतात. सजीवत्वाला व पर्यायने जीवशास्त्राला स्थान द्यायला तयार नसतात. एकापासून दहा, दहा ते शंभर याची उत्तरे मिळतात..पण मुळात शून्यातून 0.00000000001 का तयार झालं याचं उत्तर काय? मूल जन्माला येताना त्याचा केवळ हात तयार करायला कुशल कारागिरांना शेकडो वर्षे लागतील पण निसर्ग त्या अर्भकाचं पूर्ण शरीर नऊ महिन्यात तयार करून पाठवतो.(Mind Power – Swami Vijnananand) हे तयार करणारी कोणती शक्ती आहे? तिचं अस्तित्त्व मान्य करणार की नाही? तिथे तर्क ओशाळतो व त्या जागी मनाचा, आत्म्याचा हेतू येतो. मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रथमचिंतक स्वामी विज्ञानानंद तर म्हणतात की शरीरातल्या पेशीपेशीला मन आहे आणि या सर्वांवर सत्ता गाजवणारं संघटक मनही आहे. हे संघटक मन किंवा जीवात्मा जेव्हा ताकदवान असतो तेव्हा सर्व पेशींना कवेत ठेवतो. पण जेव्हा याचा जोर ओसरतो, तेव्हा दबलेल्या पेशी बंडाळी करतात. म्हणून मृत्यू झाला तरीही शरीराचे अवयव चालूच राहतात. कारण जातं ते संघटक मन. शरीरदान केल्यावर फुफ्फुसे, हृदयाचे प्रत्यारोपण करता येते ते सुद्धा ते अवयव जीवंत असे पर्यंतच..”

“अरे विक्रमा हे वेगळंच काहीतरी..पण या गोष्टीला पुरावा काय? यात काही संशोधन झालंय?”

“मनशक्ती प्रयोगकेंद्रासारख्या वैदिक ज्ञान व आधुनिक शास्त्रे यांची सांगड घालणाऱ्या संशोधन केंद्रांमध्ये हे संशोधन निश्चितच चालू आहे. त्यावर आधारित यंत्रेही सिद्ध झालेली आहेत. ही काही पुराणातली वांगी नाहीत..किंवा भाकडकथा नाही..”

“अरे कळलं रे..एवढं म्हणतोस हेतू, हेतू..वैशेषिकांनीतरी हेतूला स्थान दिलंय का?”

“वेताळा, पदार्थधर्मसंग्रह ग्रंथाची सुरुवातच प्रशस्तपादऋषी खालील प्रमाणे करतात:
प्रणम्य हेतुमीश्वरं मुनिं कणादमन्वत:‌|
पदार्थधर्म्मसङग्रह: प्रवक्ष्यते महोदय: ||
हेतुरूप ईश्वराला प्रणाम करून मी कणाद मुनिंना प्रणाम करतो. त्यानंतर मी मोक्षाला सहाय्यक होऊ शकेल असा पदार्थधर्म्मसङग्रह नावाचा ग्रंथ लिहितो. वैशेषिक विचारांची झलकच प्रशस्तपाद ऋषी या पहिल्या श्लोकातून देतात. एकतर ईश्वराला परमात्मा, किंवा देवांच्या अवताराचे नाव न देता ते पदार्थधर्मामागे असणाऱ्या हेतूचे स्थान देतात. वैशेषिक पदार्थविज्ञान हे ज्ञानरूपी ईश्वरप्राप्तीचे व त्यामार्गे मोक्षप्रप्तीचे साधनच असल्याचे ते या पहिल्या श्लोकातूनच दाखवून देतात.”

“अच्छा म्हणजे वैशेषिकांच्या मतानुसार मोक्षप्राप्ती हे पदार्थविज्ञानाच्या अभ्यासाचे ध्येय आहे..”

“हो प्रशस्तपाद लिहितात
द्रव्यगुणकर्म्मसामान्यविशेषसमवायानां षण्णां पदार्थानां साधर्म्यवैधर्म्यतत्वज्ञानं नि:श्रेयसहेतु:|
सर्वोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणत्याही पदार्थाच्या द्रव्य(substance), गुण(qualities), कर्म(motion), सामान्य(classification), विशेष(individuality) आणि समवाय(inseparable components) या सहा अंगांचे व त्या दृष्टीने इतर पदार्थांशी असलेल्या साधर्म्य वैधर्म्याचे ज्ञान आवश्यक आहे. पदार्थधर्माची ही ६ अंगे आहेत. यातील पहिली तीन अंगे ही इंद्रीय गोचर जाणीवेतून लक्षात येणारी तर राहिलेली तीन ही तार्किक विश्लेषणांती कळणारी आहेत.

तच्चेश्वरचोदनाभिव्यक्ताध्दर्म्मादेव ||
ईश्वराचे विविध आदेशच वर दिलेल्या पदार्थधर्मातून अभिव्यक्त होतात. पदार्थाच्या या ६ अंगांच्या अभ्यासातूनच पदार्थधर्माचे व परिणामी ईश्वराच्या हेतूंचे आकलन होते. अशारितीने प्रशस्तपादाने पदार्थाच्या या अभ्यासामागे परमेश्वरी हेतुंचा अभ्यास करणे असा उद्देश असल्याचे सांगून पुन्हा एकदा ज्ञानमार्गाने मोक्षप्राप्तीचा हेतू ठसवून दिला आहे. हे एकंदर वैशेषिक दृष्टिकोनाचेच वैशिष्ट्य ठरावे.”

“म्हणजे राजा, नवीन जे शोधलं गेलं आहे ते बिनकामाचं कसं ठरवता येईल..कसं शक्य आहे?”

“हे विधान चुकीचं आहेच. निव्वळ भौतिकशास्त्राच्या कक्षेत राहून विचार करायचा असेल, मोजमापाची सूक्ष्मता हवी असेल, जडवाद मानून चालायचं असेल तर पाश्चात्य विज्ञान महत्त्वाचं..अणुविज्ञान, खगोलशास्त्रातली मापने, उपग्रह यात आधुनिक विज्ञान कितीतरी पुढे गेलेले आहे..पण मी आधी म्हटल्याप्रमाणे ते सजीवत्वपासून हट्टाने वेगळे ठेवले गेलेले आहे. त्यामुळे व्यापकपणे पदार्थविज्ञान जीवशास्त्राच्या सीमारेषेपलिकडे न्यायचं असेल, वैश्विक करायचं असेल, सर्व जड-अजड त्यात सामावायचं असेल तर वैशेषिकाला पर्याय नाही..उलट वैशेषिकातच आधुनिक विज्ञानाच्या मापनपद्धती अंगीकारल्या गेल्या तर वेगळं काहीतरी हाती नक्कीच लागेल..”



“म्हणजे मनशक्ती प्रयोगकेंद्र करत असलेल्या संशोधनासारखं..जुन्या नव्याचा संगम?”

“अगदी बरोबर वेताळा..अशा अनेक संस्था असू शकतील, त्या आपल्याला माहितही नसतील..पण या क्षेत्रात संशोधन चालू आहे हे निश्चित..”

“विक्रमा, काहीतरी महत्वाचं नक्कीच बोललास..पण या अभ्यासातून मोक्षप्राप्ती कशी होईल हे सांगितलं नाहीस..पण आता ते जाणून घ्यायला वेळ नाही. शिवाय वैशेषिकांचे विज्ञानेश्वर प्रशस्तपादांच्या पुस्तकातील साऱ्या गोष्टी व त्यांच वर्तमानातलं प्रयोजन जाणून घ्यायला नक्कीच येईन..चल राजा..”

आजचा आसमंत काही वेगळा होता..विक्रमराजा मन, बुद्धी वगैरे बोलत होता..पहिल्यांदा त्यांचं म्हणणं कळल्यासारखं वाटलं..”विक्रमाचा सारथी स्वत:शीच पुटपुटत होता..घोड्याला खरारा करत होता..सारथीच काय पण तेथील प्रत्येक स्थिरचर आता पुढच्या भेटीची वाट पाहू लागला होता..निर्जीव पदार्थविज्ञान आता वैशेषिकामुळे सजीव झालं होतं..सर्वांनाच हवंहवंसं वाटत होतं..तिथल्या भूतांना व महाभूतांनाही!

(क्रमश:)         

No comments:

Post a Comment