Sunday, 18 March 2018

मी पृथ्वीद्रव्य ऊर्फ स्थायुद्रव्य बोलतोय (The Solid Substance Comes calling!!)


ऊन सावल्यांचा खेळ चालूच राहतो. सावल्या म्हणजे तरी काय तर एखाद्या न दिसणाऱ्या पदार्थाचे अमूर्त अस्तित्त्व. त्यातही स्थिर सावल्या या स्थायूंच्याच. मजा म्हणजे स्थायूचा रंग कसाही असला तरी सावली काळीच. खरेतर पर्वतराजींपासून समुद्रसपाटीपर्यंत पसरलेला स्थायूंचा पसारा, इतकाच नव्हे तर सजीवांच्याही त्वचा, हाडे, दात, केस सर्वत्र स्थायूच स्थायू, निपचित पडलेले पण स्थैर्य देणारे, शक्ती देणारे, दुसऱ्याला प्रसंगी आडवणारे आणि ढकलणारे स्थायू किंवा पृथ्वीद्रव्यच..

“विक्रमा, मला या द्रव्यांविषयी तुला सविस्तर विचारायचंच होतं” वेताळाने विक्रमाच्या पाठीवर स्वत:ला लादलं व तो बोलू लागला. “या ज्या नवद्रव्यांविषयी तू पहिल्यापासून सांगतोयस त्यांचे सविस्तर वर्णन करायची वेळ आली आहे असं वाटतं..चल सांगायलाग बरं पृथ्वीद्रव्यापासून..”

“हो..पण यावेळी मी तुला हे वर्णन ऐकवण्यासाठी दुसऱ्या काळात घेउन जाणार आहे, आधुनिक काळात, तिथे हे पृथ्वीद्रव्य आभासी आकृतीच्या रूपात प्रकट होईल व त्याला काव्या व मुद्रा नावाच्या दोन शाळकरी मुली प्रश्न विचारून भंडावून सोडतील..अगदी तू प्रश्न विचरतोस तसा..”

"चल तर मग विक्रमा.."


काव्या व मुद्रा दोन शाळकरी बहिणी..एक साधारण ६वीत शिकणारी व मुद्रा २ रीत शिकणारी. दोघी बाबांच्या मोबाईलशी खेळत असतात..अचानक कुठलतरी बटन दाबतात तर मोबाईल बीप देऊ लागतो. पाहतात तर काय?

“ए काव्या ताई काय आहे हे?” मुद्रा किंचाळली.

“ए मुद्रा, मला या हॉलोग्राफिकमध्ये कुणीतरी दिसतंय..एक आकृती दिसतेय..ए ती बोलतेय काहीतरी.."

“ए ताई कोणे हा? कुठून आला? कसा आला?” मुद्रा म्हणाली.“नमस्कार मुलींनो..घाबरू नका..मी स्थायुद्रव्य बोलतोय..मी भूत नाहीये..म्हणजे तुम्हाला घाबरवणारं भूत नाही..पण भूतद्रव्यांपैकी एक..पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही आम्ही भावंडे, सर्वांना सहज कळणारी, पटकन लक्षात येणारी..”

“वा पाच भावंडं तुम्ही? मग तुम्ही खूप खेळत असाल, मी आणि माझी ताई खेळतो तसे” लहानग्या मुद्राने प्रश्न केला.

“हो हो, तर तर.
पतनोपदेशाद् गुरुत्वम् | अद्भि: सामान्यवचनाद् द्रवत्वम् | उत्तरकर्मवचनात् संस्कार: |
म्हणजे मी व आप द्रव्य गुरुत्वाकर्षणामुळे सतत ओढाओढ करत राहतो. ढकलाढकली करतो. पळापळ करतो. इकडून तिकडे जातो.

“तू म्हणतोस खरं, पण पुरावा काय तूच स्थायू किंवा पृथ्वी द्रव्य आहेस याचा? तुला ओळखायचं कसं?” मोठ्या काव्याने हुशारीचा प्रश्न टाकला.

“वा वा. काय प्रश्न! याचं उत्तर कणादांनी वैशेषिकातील दोन सूत्रात दिलेलं आहे. गुणविनिवेशाधिकार आणि चक्षुषघटितसूत्र. यातील गुणविनिवेशाधिकारात म्हटलंय
रूपरसगन्धस्पर्शवती पृथिवी |
म्हणजे स्थायूंना रंग, चव, वास व स्पर्श असतो. तो माझाच गुणविशेष”

“अरे यात सगळीच ज्ञानेंद्रिये किंवा sense organs आली. पटकन ओळखायचे असेल तर काय करायचे?” काव्याचा प्रश्न..

“ती पण युक्ती प्रशस्तपादांनी सांगितली आहे.

चाक्षुषवचनात् सप्त सङ्ख्यादय: |
म्हणजेच डोळ्यांनी आमचे म्हणजे पृथ्वीद्रव्यात मोडणाऱ्या वस्तूंचे सात गुण ओळखता येतात. 

कणादांच्या चाक्षुषघटितसूत्रात म्हटलंय
संख्यापरिमाणानि पृथक्त्वं संयोगविभागौ परत्वापरत्त्वे कर्म्मच रूपिद्रव्यसमवायाच्चाक्षुषाणि |
संख्या, परिमाण, वेगळे असणे, जवळ येणे व दूर जाणे, मोठे-लहान असणे, हालचाल करणे, रंग असणे हे सर्व गुण केवळ डोळ्यांनीच किंवा चक्षुंनीच जाणवू शकतात.”

“वा म्हणजे तुला पण आमच्या सारखे रंगबिरंगी कपडे घालायला आवडतात?” मुद्राचा बालसुलभ प्रश्न.

“तर तर.
रूपमनेकप्रकारं शुक्लादि | या श्लोकानुसार आम्ही पांढरा, निळा, किरमिजी इत्यादी अनेक रंगात असतो.
रस: षड्विधो मधुरादि | या श्लोकानुसार गोड, आंबट, तुरट इत्यादी सहा चवी असतात आम्हाला.
गन्धो द्विविध: सुरभिरसुरभिश्च | नुसार आम्हाला हवासा व नकोसा असे दोन वास असतात.
स्पर्शोऽस्या अनुष्णशीतत्वे सति पाकज: | नुसार आम्ही गरम किंवा थंड लागू शकतो, पण ते आमच्या संपर्कात तेज द्रव्य आल्याने होते.”

“स्थायू द्रव्या, तू वासाचे काय म्हणालास? केवळ स्थायूलाच वास असतो?”

“होय काव्या. प्रशस्तपाद भाष्यात असेच म्हटले आहे की कोणत्याही ठिकाणी येणारा वास हा स्थायूमुळे येतो..”

“हे जरा वेगळं वाटतंय. मी तर ऐकलंय की अमोनिया वगैरे वायूंनाही वास असतो. पण हा वास घेण्यात काही वाटा आहे का तुम्हा स्थायूंचा?”

“हो प्रशस्तपाद म्हणतात
इन्द्रियं गन्धव्यञ्जकं सर्वप्राणिनां जलाद्यनभिभूतै: पार्थिवावयवैरारब्धं घ्राणम् |
वासाची जाणीव करून देणारे इंद्रिय गंधेंद्रिय आहे. ते सर्वच प्राण्यांमध्ये असते. ते स्थायूद्रव्याच्या अणूंचे बनलेले असून त्या अणूंवर जल तसेच इतर द्रव्यांचा काहीही परिणाम होत नाही."

“मग, जरा थोडक्यात सांगशील तुझे सर्व गुण?” काव्याने नीट लक्ष देत प्रश्न विचारला.

“हो हो. प्रशस्तपादांनीच सांगितलंय.
पृथिवीत्वाभिसम्बन्धात् पृथिवी | म्हणजे पृथ्वीवरील सर्व स्थायूद्रव्ये ही पृथ्वी या द्रव्यांच्या गटात मोडतात.”

“गट? म्हणजे मी ६ रीच्या अ वर्गात आहे तसं..त्यातही आमचे पृथ्वी, अग्नि, जल व आकाश हे गट आहेत.” मुद्रा म्हणाली.

“हो तसंच. अगदी बरोबर.”

“मग तुमच्या पृथ्वीगटात काय काय येतं? तुम्ही कुठे असता? आमच्या कार्टून मधल्या डोरेमॉन सारखे जादुई तरीही खोटेच असता का तुम्ही?”

“नाही नाही. आम्ही सर्वत्र असतो. आम्ही मूर्तरूपात असतो.

विषयस्तु द्व्यणुकादिक्रमेणारब्धस्त्रिविधो मृत्पाषाणस्थावरलक्षण: |
नेहमीच्या वापरातील वस्तूंचे रेणू हे दोन, तीन तसेच त्याहीपेक्षा अधिक अणूंच्या एकत्र येण्यातून बनलेले असतात आणि ते तीन प्रकारचे असतात – माती, दगड व पाने-फुले इत्यादी स्थावर गोष्टी. 

म्हणजे मातीचे प्रकार, दगडांचे प्रकार व सर्व सजीवसृष्टी ही पृथ्वीद्रव्याने बनलेली आहे.तत्र भूप्रदेशा: प्राकारेष्टकादयो मृत्प्रकारा: |
त्यातील पहिल्या प्रकारचे स्थायू म्हणजेच माती(soil) ही पृथ्वीच्या विविध प्रदेशांमधील सर्वात वरच्या थरांमध्ये मिळते. मातीपासून विटा व भिंती इत्यादींमध्येही उपयोगी गोष्टी बनतात.पाषाणा उपलमणिवज्रादय: |
दुसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये म्हणजेच पाषाणां(minerals) मध्ये खनिजे, विविध रत्ने, हिरे, माणके व अन्य मोडतात.स्थावरास्तृणौषधिवृक्षलतावतानवनस्पतय इति |
तिसऱ्या प्रकारच्या स्थावर स्थायूंमध्ये गवत, औषधी वनस्पती, झाडे – त्यांची फुले व फळे,  वेली, फुलांविनाच फळे येणाऱ्या वनस्पती व अन्य तत्सम प्रकार मोडतात.

“म्हणजे तुला असं म्हणायचंय की या सर्व स्थावर सजीवांमध्ये पूर्ण पृथ्वीद्रव्यच भरलेलं आहे?”

“नाही. तसं नाही. प्रशस्तपादांनी म्हटलंय
त्रिविधं चास्या: कार्य्यम् | शरीरेन्द्रियविषयसंज्ञकम् |
स्थायूपदार्थांचे तीन प्रकार आहेत – शरीरे(body), इन्द्रिये(organs) व जाणिवेला कळणाऱ्या विविध वस्तू(perceptible objects). 

यातही शरीराचे दोन प्रकार सांगितले आहेत.
शरीरं द्विविधं योनिजमयोनिजञ्च |
शरीरे दोन प्रकारची असतात, मातेच्या गर्भातून जन्माला येणारी व तशी न येणारी.

त्यातली दुसऱ्या प्रकारची म्हणजे गर्भातून जन्माला न येणारी शरीरे पाहू.
तत्रायोनिजमनपेक्ष्य शुक्रशोणितं देवर्षीणां शरीरं धर्मविशेषसहितेभ्योऽणुभ्यो जायते |
यातील दुसऱ्या प्रकारची शरीरे ही देवता व ऋषी इत्यादिंची असून ती पित्याचे शुक्राणू व मातेचे शोणित यांच्या संगमातून जन्माला आलेली नसतात, किंबहुना त्यांची शरीरे ही पुण्यकर्मांचे फळ म्हणून आकाराला येतात.

“म्हणजे काय?”

“प्रशस्तपादभाष्यातील प्रत्येकच गोष्ट आता कळू शकेल असे नाही. कदाचित याचा अर्थ देव व ऋषी हे आपण स्मरणस्वरूपात लक्षात ठेवत असल्याने त्याचे वर्णन असे असावे. किंवा गर्भात असताना चांगले संस्कार झाल्यास देवासारखी किंवा ऋषींसारखी व्यक्तिमत्वे आकाराला येतात असा अर्थ घेऊ. पण यातीलच दुसरा प्रकार हा अमीबा, विषाणू, रोगप्रसारक परजीवी यांना उद्देशून लिहिल्यासारखा वाटतो.

क्षुद्रजन्तूंनां यातनाशरीराण्यधर्मविशेषसहितेभ्योऽणुभ्यो जायन्ते |
तसेच किडामुंग्यांची शरीरे ही जीवांना काही विशिष्ट पापांची शिक्षा म्हणून लाभलेली असतात आणि तीही अतिसूक्ष्म कणांवर झालेल्या पापकर्मांचे फळ म्हणून आकाराला येतात. लहान, लहान अल्पायुषी कृमी कीटकांचा जन्म हा त्रास भोगण्याचा जन्म अशी तेव्हाची कल्पना यातून स्पष्ट दिसते. किंवा जन्मताना गर्भावर चांगले संस्कार झाले नाहीतर वाईट प्रवृत्तीची माणसे जन्माला येतात असा अर्थ घेऊ.”

“अरेच्चा, मग माझा जन्म कसा झाला?”काव्याने अतिउत्सुकतेने प्रश्न विचारला.

“तुम्हा माणसांचा जन्म आई व वडिलांच्या माध्यमातून झाला.
शुक्रशोणितसन्निपातजं योनिजम् |
मातेच्या गर्भाद्वारे जन्माला येणारी शरीरे ही शुक्राणू व शोणित यांच्या पासून निर्माण झालेली असतात. त्यांचेही दोन प्रकार आहेत.

तद् द्विविधम् जरायुजमण्डजञ्च |
गर्भातून जन्माला येणारी शरीरेही दोन प्रकारची असतात – जरायुज किंवा सस्तन आणि अण्डज किंवा अंडी घालणारे. तुम्ही माणसं जरायुज प्रकारातली.
मानुषपशुमृगाणां जरायुजम् |
माणूस, गायी आणि इतर चार पायांचे प्राणी हे जरायुज किंवा सस्तन वर्गात मोडणारे आहेत.”

“आणि मग पक्षी वगैरे?”

“पक्ष्यांचा जन्म अण्ड्यातून होतो.
पक्षिसरीसृपाणामण्डजम् |
पक्षी व सरपटणारे प्राणी हे अंडी घालणारे किंवा अंडज आहेत.

“पण पृथ्वीद्रव्या, हे वेगवेगळ्या प्रकरचे स्थायू कधी नष्ट होतात? तू अमर आहेस का माणसासारखाच कधीतरी मरतोस?”

“ किती सुंदर प्रश्न! माझी दोन रूपे आहेत किंवा दोन प्रकारची रूपे आहेत. अणूरूपातून सुरु होऊन ब्रह्मांडरूपापर्यंत मी मोठा होऊ शकतो किंवा लहान होऊ शकतो. प्रशस्तपादांनी म्हटलंय
सा च द्विविधा – नित्या चानित्या च |
ती म्हणजे पृथ्वी दोन प्रकारची असते – टिकाऊ आणि तात्कालिक अस्तित्व असणारी.
परमाणुलक्षणा नित्या, कार्य्यलक्षणात्वनित्या |
अणुरूपात स्थायू हे अनंतकाळापर्यंत राहतात, पण नेहमीच्या बघण्या-वापरण्यातील स्थायूंचे अस्तित्व हे तात्कालिक असते.
सा च स्थैर्य्याद्यवयवसन्निवेशविशिष्टाऽपरजातिबहुत्वोपेता शयनासनाद्यनेकोपकारकरी च |
तात्कालिक अस्तित्व असणाऱ्या स्थायूंमधील घटकांची एक विशिष्ट योजना असल्यानेच त्यांना स्थायूचा आकार येतो. त्यांचे अनेक प्रकार असतात व त्यांच्याद्वारे आपल्याला बिछाना, खुर्ची अशा अनेक गोष्टी मिळतात ”

“वा वा..किती नी काय काय देते हे पृथ्वीद्रव्य! आमचा हा आता मित्र झाला..” दोघी उड्या मारत त्याला म्हणाल्या.

“हो हो का नाही..काव्याने विचारल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा माझे गुण सारांशात सांगतो
रूपरसगन्धस्पर्शसङ्ख्यापरिमाणपृथकत्वसंयोगविभागपरत्वापरत्वगुरुत्वद्रवत्वसंस्कारवती |
आम्हाला म्हणजे स्थायुद्रव्यांना रंग, चव, वास, स्पर्श(तापमान), संख्या, मोजमापे, वेगळेपणा असतो. आम्ही लांब किंवा जवळ जाऊ – येऊ शकतो, आमच्यावर गुरुत्वबल कार्य करते, आम्ही प्रवाही असतो व दुसऱ्या द्रव्यांवर बाह्यबळ लावू शकतो.”

“वा वा..किती मज्जा मज्जा करतोस तू..” लहानग्या मुद्राने टाळ्या पिटल्या.“काव्या, मुद्रा, माझा मोबाईल कुठंय? तुम्ही घेतलाय का?” बाबांचा आवाज आला.

“अरेच्चा बाबा येतील. चल पृथ्वीद्रव्या लॉग आऊट करते..”काव्या म्हणाली.

“अच्छा, चला येतो. आता दिसेनासा झालो तरी तुमच्या आजुबाजूला वेगवेगळ्या स्वरूपात मी आहेच असे लक्षात ठेवा. माझ्या इतर द्रव्यबांधवांनाही भेटा..”

पृथ्वीद्रव्याची हॉलोग्रफिक छबी लुप्त झाली. वेताळ म्हणाला “मजा आली बाबा विक्रमा, या मुली फारच छान प्रश्न विचारतात. आता मलाही जायला पाहिजे. या स्थायुरूप पार्थिवातून बाहेर पडलं पाहिजे. येतो मी विक्रमा..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

(क्रमश:)


मूळ लेख: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

No comments:

Post a Comment