Friday 22 December 2017

पदार्थांमध्ये चालणाऱ्या स्थिर–चर, दृष्य-अदृष्य अशा ९ द्रव्यांच्या खेळाची मजा पाहणे (How to enjoy the intermingling of nine Vaisheshika substances in the context of a Padarth)

पुन्हा एकदा अमावस्या जवळ आली. पुन्हा चंद्रबिंब काळवंडलं. पुन्हा रात्रीची घनगंभीरता वाढली. अमावस्या पौर्णिमेच्या चौकटीत बांधलेल्या काळाच्या प्रत्येक टप्प्यावर राजा विक्रमाच्या त्या राज्यात अनेकविध बदल घडत. शेवटी राज्य म्हणजे तरी काय? केवळ पृथ्वीद्रव्याने भारलेल्या जमिनी, राजवाडे, किल्ले का आपद्रव्याने व्यापलेल्या नदी, ओढे, नाले का वायुरूपाने अच्छादिलेला सर्व परिसर? का याहूनही अजून काही. केवळ भौतिकतावादी दृष्टिकोनातून तरी एवढंच. पण राजा विक्रमाला मात्र उमगलं होतं की त्याचं राज्य हा सुद्धा एका महाकाय पदार्थासारखाच होता. भौतिकतावादा नुसार जरी स्थायू, द्रव, वायू द्रव्यांनी परिपूर्ण असं राज्याचं वैभव असलं तरी याही पुढे त्याच्या राज्यात यज्ञाच्या रूपानं तेजाची आराधना, त्यागाची, सूर्यदेवतेची आराधना चालू होती, विविध मंत्रघोषांच्या, सद्विचारांच्या पावन घोषांच्या स्वरूपात त्याच्या राज्याच्या आकाश तत्त्वात विधायकता भरून राहिली होती. काल तत्वाच्या किंवा दिक् तत्त्वाच्या महाकाय सर्वव्यापी मापदंडांमध्ये त्याच्या राज्यात सर्वत्र विकासच आढळून येत होता. पण या सर्वांचं कारण केवळ त्याचे प्रजाजनच होते. प्रजाजनांची मन तत्त्वं विधायक कामाकडे लक्ष देत असल्याने, त्याचा उत्कर्ष त्यांना दिसत असल्याने, भौतिक सुख परिपूर्ण असल्याने त्याची आत्ततत्वेही सुखाचा अनुभव घेत होती. विक्रमाच राजाला त्याच्यासंबंधी सतत विचार करण्याची एक अशी पद्धतच पडून गेली होती.

“काय रे विक्रमा ही विचारांची पद्धत सुद्धा वैशेषिक गुरूंनी, पदार्थविज्ञान गुरूंनी घालून दिली काय तुला?” नेहमी प्रमाणेच विक्रमाच्या मनाभोवती घुटमळणाऱ्या विचारतरंगांना एखाद्या पुस्तकासारख्या वाचणाऱ्या वेताळाने विक्रमाला विचारले.
विक्रमराजा त्याच्या विचारसमाधीतून बाहेर पडत म्हणाला “तसं म्हणू शकतोस तू. खरेतर एकंदर आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील काही गोष्टी आपोआपच विचारात घेतो. पण त्यातून काही मुद्दे सुटून जायची शक्यता असते. वैशेषिक आचार्यांनी बहुधा हाच विचार लक्षात घेऊन ही पदार्थाची ६ अंगे, ९द्रव्ये, ५ हालचाली इत्यादि संख्या निश्चित केल्या असव्यात. हेतू हा असावा की त्यातून पडताळणी करण्यासाठी निश्चित अशी यादी समोर असावी.”

“तू चाललास पुन्हा वाहात..थांबमी तुला जरा दिशा देतो..सर्वांच्याच घरात एक तुळशी वृंदावन असते. घरातील लहान मोठे, स्त्री पुरुष याची वेगवेगळ्यावेळी पूजा करतात. तुळस टवटवीत राहावी याची काळजी घेतात. तर मला सांग की हा तुळशीवृंदावन पदार्थ घेतला तर त्यातील नवद्रव्ये कोणती? त्या पदार्थाची ६ अंगे कोणती? थोडक्यात सांग. पाल्हाळ नको.”
“नवीन काळात कुठली रे तुळशी वृंदावने, पण तरीही लहान लहान कुंड्यांमध्ये तुळशी लावतातच.”



प्रशस्तपाद ऋषींनी द्रव्यांगाची लक्षणे सांगताना म्हटलंय की या द्रव्यांना अस्तित्त्व असते, त्यांना व्यक्त करता येते, त्यांना जाणून घेता येते, त्यांचे काही अन्योन्य संबंध असतात, ती संख्येने अनेक असतात, त्यांना गुण असतात, ते  हालचाली करतात, त्यांचा सजीवतेशी संबंध असतो, त्यांचे वर्गीकरण करता येते, त्यांचे काही विशेष अणुरूप, रेणुरूप अस्तित्त्व असते. त्यातील काही नित्य तर काही अनित्य असतात. काहींचा दुसऱ्यांवर परिणाम होतो तर काही नैमित्तिकच असतात. इतर द्रव्यांच्या निर्मितीला यातील काही कारण ठरतात. यातील काहींमध्ये इतर द्रव्ये आश्रयाला येतात तर काही आश्रयाला जातात. प्रशस्तपाद भाष्याच्या तिसऱ्या धड्यात हे सर्व विवेचन आलेले आहे.”

“विक्रमा, सदर्भ दिलास हे छान झालं. आता आपल्या उदाहरणात परत ये.”

तर या तुळशीच्या कुंडीभोवताली ही नवद्रव्ये कशी बागडत असतात ते पाहू. पहिलं म्हणजे पृथ्वीद्रव्य. तर कुंडी ही या द्रव्याची, आतील काळी किंवा लाल माती ही या द्रव्याची, तुळशीचं शरीर हे सुद्धा या पृथ्वी द्रव्याचं. दुसरं म्हणजे आप किंवा जलरूप द्रव्य. सकाळी पूजेच्या कलशातून वा इतर भांड्यातून हे द्रव्य वाहात वाहात वरच्या थरातून मुळापर्यत गेलं. काही मुळांनी शोषून घेतलं. काही मातीच्या कणांना चिकटलं. राहिलेलं गळून निघून गेलं. कारण वाहणं हा या आपद्रव्याचा गुण. शिवाय तुळशीच्या शरीरातील विविध रस, विकरे(enzymes) ही सुद्धा आपद्रव्याची.”

“विक्रमा, जास्त खोलात शिरु नकोस आत्ता..तेजा बद्दल सांग..”

“हो तर वातावरणात असलेली ऊब, ऊष्णता, मुळांच्या भोवती असणारी ऊब हे सर्व तेजाचे प्रकार. उष्णता, गारवा हे तेजाचे लक्षण. आताच्या शास्त्रानुसार ऊर्जेची विविध रूपे ही सुद्धा तेजरूपच. नंतरचे चौथे द्रव्य म्हणजे आकाशद्रव्य. तर या कुंडीभोवती सूर्यकिरणांतून येणारे विद्युत्चुंबकीय तरंग फेर धरून नाचताहेत ते तरंग म्हणजेच आकाशद्रव्य. शिवाय तुळशी कडे पाहून केलेले सद्विचार, म्हटली गेलेली स्तोत्रे हे शब्दतरंग. हे विविध तरंग म्हणजेच आकाशद्रव्याची उदाहरणे. जितके या आकाशात विधायक तरंग तेवढी प्रसन्नता मोठी..”

“विक्रमा, खोलात नंतर शिरूया रे..ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश द्रव्ये आपण पाहिली..म्हणजे चार भूतद्रव्ये व आकाश हे महाभूत पाहिले..आता दिक् व काल द्रव्यांविषयी सांग..”

“दिक् व काल ही सर्वव्यापी, सर्वसंचारी द्रव्ये. कधीही एका ठिकाणी न राहणारी. आपली घड्याळे ही केवळ कालाचे दर्शक. सकाळी ७ वाजता तुळशीला पूजेनंतर पाणी घातले. ९ वाजेपर्यंत घरातील सर्वांनी या तुळशीला जवळून, लांबून, कधी हात जोडून, कधी मनातल्यामनात असा नमस्कार केला..ऊन वाढल्यावर घरातील गृहिणीने दुपारी पुन्हा थोडे पाणी घातले. त्या आधी थोडे खुरपले. अशाप्रकारे या काळद्रव्याच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी घडल्या..”

“अच्छा म्हणजे कालद्रव्य हे केवळासंदर्भाठीच आहे? ते  स्वत: काहीच करत नाही?”

“नाही. ते केवळ संदर्भाला सहाय्य करते. तसेच काहिसे दिक् याद्रव्याचे. याचा अर्थ जागा. त्याच्याही मोजपट्ट्या माणसाने तयार केल्या. म्हणजे तुळशीच्या कुंडीची उंची इतकी, परिघ इतका, तिचे आकारमान इतके. तुळशी आणली तेव्हा एक वीत होती. आता एक फुटाची झाली असे दिक् द्रव्याचे विविध निर्देशक वेगवेगळ्या संदर्भात  येऊन चिकटतात व संदर्भ बदलल्यावर निघून जातात. अशाप्रकारे दिक् ही सुदरी मोजपट्टी. केवळ संदर्भाला साहाय्य करणारी..”

“आता मन व आत्मा..”

“या द्रव्यांसंबंधी स्थूलार्थाने काय बोलावं. कुंडी उचलताना हाताचा जिथे कुंडीशी संयोग झाला तेथे मन येऊन गेलं. नमस्कार करताना, पाहताना पाहणाऱ्याचं मन या तुळशीजवळ आलं व क्षणात उडून दुसरीकडे जाणाऱ्या फुलपाखरासारखं हे मनही दुसरीकडे उडून गेलं..”

“म्हणजे विक्रमा स्थल, काल, मन ही सर्वच अशी संदर्भाबरोबर उडणारी व बसणारी फुलपाखरं आहेत..त्यांचा काहीही परिणाम होत नाही तुळशीवर..”

“वेताळा स्थळ व काळ हीच नैमित्तिक आहेत. पण मनाला शक्ती आहे. मनामध्ये कार्यकारी शक्ती आहे. घरातील कोणी व्यक्ती या तुळशीची प्रसन्नतेने पूजा करत असेल, विधायक विचार करत असेल तर त्या विचारतरंगांमुळे तुळस तजेलदार दिसेल..ती मने ज्या सजीवांशी संबंधित असतात त्यांची आत्मद्रव्येही त्या तुळशीशी निगडित होतात..सुख, दुख, इच्छा, द्वेष हे या आत्म्यांचे गुण..”

“विक्रमा, आत्म्याविषयी तू मला सांगतोस? आत्मा हा सुद्धा न दिसणारा आहे. त्याला देहाश्रयाशिवाय व्यक्त होता येत नाही. म्हणून तर दर अमावस्येला या मृतशरीरात मला प्रवेश करावा लागतो..पण विक्रमा या तुळशी भोवती चालणाऱ्या विविध द्रव्यांच्या खेळासंबंधी सांगून त्यांच्या गुण या अंगाविषयी जाणण्याची उत्सुकता तू अधिकच ताणलीस..पण आता या मृतशरीराचा आश्रय सोडून जाण्याची वेळ झाली..पुन्हा भेटायचंय राजा..विसरू नकोस..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

झालं..वेताळ गेला तसं आजुबाजूचे सारे स्थिरचर दर अमावस्येप्रमाणेच विचार मंथनात रममाण झाले.. 

“दर अमावस्येला झाकोळला जाणारा चंद्र सुद्धा आपल्याकडे कुणा आत्म्याचं लक्ष नाही हे पाहून स्वत:मधील द्रव्यांचा विचार बहुतेक करू लागला असावा..”त्या रात्री विक्रमा बरोबर आलेल्या राजकवीचने आपली कल्पना बोलून दाखवली..

विक्रमाने स्मितहास्य केलं व म्हणाला “राजकवीच तुम्ही..तुमचा आत्मा कल्पनारंजनाने तृप्त होतो..उद्याच्या सभेत यावर एक उत्तम काव्य तुम्ही ऐकवाच..”

“महाराजांची आज्ञा शिरसावंद्य..” राजकवींनी दुजोरा देत प्रणिपात केला..

विक्रमाने सारथ्याला प्रस्थान करण्याची आज्ञा दिली..अमावस्येचा अंधार आजुबाजूला असला तरी त्या सारथ्याच्या मनातला एक कोपरा ज्ञानाने उजळला होता..  


(क्रमश:)   

No comments:

Post a Comment