Showing posts with label states of matter. Show all posts
Showing posts with label states of matter. Show all posts

Saturday, 30 December 2017

पदार्थात होणाऱ्या भौतिक बदलांचा अभ्यास (Appreciating the physical changes in substances)

बदल हा तर निसर्गाचा स्वभाव गुण..सतत बदलत राहणं, जुन्याच्या जागी नवं घेणं, नवी पालवी फुटणं. नवेपणा जाऊन जीर्णपणा येणं. उन्हा मागून पाऊस, पावसानंतर शिशिर, मग शरद असं फेर धरून चालणं हे निसर्गाचं नित्याचं काम. काही बदल होत राहतात. यातील काही कायम टिकतात. काही तात्कालिक व पुन्हा मागील पाढे पंचावन्न. नदीच्या पाण्यात घासल्या जाणाऱ्या दगडांचे क्षार मिसळून नष्ट झाले म्हणता म्हणता उन्हाळ्यात नदी कोरडी झाली की क्षारांनी पुन्हा आपलं डोकं वर काढाव. एखाद्या टपून बसलेल्या शत्रूने संधी येताच डोकं काढावं तसं.

“विक्रमा खरंच मला तर ह्या बदलांचं काही कळेनासंच झालंय बघ. पाण्यात मीठ मिसळाव. मग ते नष्ट झाल्याचं वाटून पाणी मात्र खारट झालेलं असतं. पुन्हा त्या पाण्याला उकळलं तर पाण्याचं बाष्प व्हावं व मीठ खाली राहावं..ही काय भानगड आहे? ह्या बदलाला कारण झालं कोण? स्पर्श किंवा तापमान बदललं कशामुळे?”

“वेताळा, तेजाचा तापमानाशी समवाय संबंध आहे असं आपण मागच्या एका अमावस्येला बोललो होतो. तापमानात घट झाली म्हणजे तेज गुण बदलला. प्रशस्तपाद म्हणतात
कारणत्वञ्चान्यत्र पारिमाण्डल्यादिभ्य: |
The quality of being the cause belongs to all (substances, qualities and actions) except the atomic measure.
दुसऱ्या कशालातरी कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.”

“नाही, म्हणजे ते ठीक आहे. पण हे विशेष अंग सोडून बाकी अंगे ते पदार्थ बदलतात कधी? आणि कोण त्यांना बदलतं?”

“अगदी बरोबर ठिकाणी नेम धरतोयस वेताळा..वर सांगितल्या प्रमाणे पदार्थाची सर्व अंगे ही द्रव्यांमुळेच असतात. म्हणूनच हा बदल सुद्धा कोणत्यातरी द्रव्यानेच होतो. याचा अर्थ असा होतो की पदार्थातील द्रव्ये ही त्यातील इतर द्रव्यांवर परिणाम घडवून आणतात. वर मी सांगितलंच आहे तेज गुण पाण्यावर कसा परिणाम करतो ते.”

“पण विक्रमा हा बदल घडवतं कोण?”

“वेताळा मागे सुद्धा मी हे सांगतलं होतं. प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय
गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे |
To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.
फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात, सामान्य संभवतात, विशेष असतात व समवाय संबंधही असतात. पण द्रव्यांशिवाय गुण, कर्म, सामान्य,विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही अस्तित्त्व उरत नाही. 

याचा एवढाच अर्थ होतो की पदार्थातील पृथ्वी, आप, तेज, वायू व मन ही द्रव्ये एकमेकांवर परिणाम करत असतात. स्थल, काल ही केवळ नैमित्तिक आहेत. प्रशस्तपाद ऋषी म्हणतात
क्षितिजलज्योतिरनिलमनसां क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि ||
To Earth, Water, Fire, Air and Mind belong the character of having actions, being corporeal, having distance and proximity, and having speed.
स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना मूर्त स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.

“अच्छा म्हणजे ही द्रव्ये बलप्रयोगाने बदल घडवतात...पण विक्रमा हे बदल कुठपर्यंत?”

“वेताळा हीच ती भौतिक व रासायनिक बदल यांमधील सीमारेषा..पदार्थात होणारा बदल जोपर्यंत त्याचा विशेष कायम ठेवतो म्हणजे पाण्याचा रेणू हा कायम राहतो तोपर्यंत तो भौतिक बदल(physical change). लाकडाच्या ओंडक्याचे तुकडे करत गेलो तर तोही भौतिक बदल. कारण या दोन्ही उदाहरणात पाणी किंवा लाकडाचा विशेषकण हा पाण्याचा रेणू व लाकडातील लहानात लहान रेणूच राहिला. पण मी जर ते लाकुड शेकोटीला वापरले तर तो भौतिक बदल राहिला नाही कारण लाकडाची राख झाली व उष्णता बाहेर पडली. लाकडाचं विशेष अंग बदललं व राख निर्माण झाली. हा झाला रासायनिक बदल(chemical change).”

“अच्छा म्हणजे पदार्थाचे विशेष अंग कायम राखून बाकी द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय संबंध यांमध्ये जर बदल झाला तर तो झाला भौतिक बदल. पण जर पदार्थातला हा बदल विशेषत्वाला बदलून गेला तर त्या पदार्थाचे मूळच बदलले व त्यात रासायनिक बदल झाला असे आपण म्हणू शकतो.”

“एखादे उदाहरण देतोस विक्रमा?”

“म्हणजे पाणी, साखर, चहा यांच्या मिश्रणाला उष्णता दिली तर तो एक भौतिक बदल झाला. पण याच मिश्रणात दूधही ओतलं व ते नेमकं नासलं तर त्या दुधात रासायनिक बदल झाला व तो चहाच वाया गेला.”

“असं असं..पण या द्रव्यांच्या गुणांमध्ये फरक झाल्याने इतरांवर परिणाम होतोय हे खरंय. पण हे सगळं करतंय कोण? कशासाठी?”

“पाश्चात्य भौतिकशास्त्रामध्ये एखाद्या बाह्यबलावर यासर्वाची जबाबदारी ढकलली जाते. पण वैशेषिकात या बाह्यबलासोबतच मन व आत्मा ही द्रव्ये असल्याने हे बदल घडवण्याची जबाबदारी साहजिकच आत्म्यावर येऊन पडते. आत्म्याचे बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष व प्रयत्न हे गुण सांगितले आहेत. शिवाय त्याला हेतु सुद्धा असतो. या हेतूवरही या भौतिक तसेच रासायनिक बदलांची जबाबदारी येऊन पडते. हा आत्मा मनाच्या सहाय्याने हे प्रयत्न करतो. वैशेषिकात मनाचे संख्या(number), परिमाण(unit), पृथकत्व(separateness), संयोग(conjunction), विभाग(disjunction), परत्व(largeness), व अपरत्व(smallness)  हे गुण सांगितले आहेत. आत्मा हा या अवयवांमधील पेशींच्या सहाय्याने हे बदल करतो किंवा तसा प्रयत्न तरी करतो.”


“सूत्ररूपात सांगायचं तर कसं बरं सांगशील विक्रमा?”

“तसं वैशेषिकात तर तसं थेट सूत्र नाही, पण संक्षेपात सांगायचं झाल्यास
  • पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यात बदल झाला पण विशेष बदललं नाही, तर तो भौतिक बदल
  • पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यातील कोणत्याही बदलासह विशेष अंगात बदल झाला तर तो रासायनिक बदल.”




“चांगला प्रयत्न आहे विक्रमा..पदार्थविज्ञानात असलेले हेतूचे स्थान सांगण्याचा. पण आता या ठिकाणी मला थांबता येणार नाही. तसा प्रयत्नही करु नकोस. मला जावंच लागेल. आत्मा तर माझ्यातही आहे. फक्त भूतद्रव्ये नाहीत तुझ्या शरीरात आहेत तशी. असो. पण पदार्थाच्या अवयवांना जाणवणाऱ्या द्रव्य, गुण व कर्म या अंगांमध्ये काही साम्ये आहेत का? प्रशस्तपादांनी त्याबाबतीत काही म्हटलंय का? तेच सामन्य, विशेष व समवाया संबंधातही विचारायंय..त्यांच्यातही काही समानता आहे का? पण आता मी निघतो. पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

वेताळही पदार्थविज्ञानाच्या कक्षेत येतो..निदान तो तसं म्हणतो हे पाहून जंगलातील इतर अदृष्य आत्म्यांनीही कान टवकारले. विक्रम वेताळाच्या गोष्टींचा पोरकटपणा म्हणून उपहास करणारे ते आत्मेसुद्धा पुढच्या अवसेची व त्यांच्या भेटीची वाट पाहू लागले..


(क्रमश:)

Friday, 22 December 2017

पदार्थांमध्ये चालणाऱ्या स्थिर–चर, दृष्य-अदृष्य अशा ९ द्रव्यांच्या खेळाची मजा पाहणे (How to enjoy the intermingling of nine Vaisheshika substances in the context of a Padarth)

पुन्हा एकदा अमावस्या जवळ आली. पुन्हा चंद्रबिंब काळवंडलं. पुन्हा रात्रीची घनगंभीरता वाढली. अमावस्या पौर्णिमेच्या चौकटीत बांधलेल्या काळाच्या प्रत्येक टप्प्यावर राजा विक्रमाच्या त्या राज्यात अनेकविध बदल घडत. शेवटी राज्य म्हणजे तरी काय? केवळ पृथ्वीद्रव्याने भारलेल्या जमिनी, राजवाडे, किल्ले का आपद्रव्याने व्यापलेल्या नदी, ओढे, नाले का वायुरूपाने अच्छादिलेला सर्व परिसर? का याहूनही अजून काही. केवळ भौतिकतावादी दृष्टिकोनातून तरी एवढंच. पण राजा विक्रमाला मात्र उमगलं होतं की त्याचं राज्य हा सुद्धा एका महाकाय पदार्थासारखाच होता. भौतिकतावादा नुसार जरी स्थायू, द्रव, वायू द्रव्यांनी परिपूर्ण असं राज्याचं वैभव असलं तरी याही पुढे त्याच्या राज्यात यज्ञाच्या रूपानं तेजाची आराधना, त्यागाची, सूर्यदेवतेची आराधना चालू होती, विविध मंत्रघोषांच्या, सद्विचारांच्या पावन घोषांच्या स्वरूपात त्याच्या राज्याच्या आकाश तत्त्वात विधायकता भरून राहिली होती. काल तत्वाच्या किंवा दिक् तत्त्वाच्या महाकाय सर्वव्यापी मापदंडांमध्ये त्याच्या राज्यात सर्वत्र विकासच आढळून येत होता. पण या सर्वांचं कारण केवळ त्याचे प्रजाजनच होते. प्रजाजनांची मन तत्त्वं विधायक कामाकडे लक्ष देत असल्याने, त्याचा उत्कर्ष त्यांना दिसत असल्याने, भौतिक सुख परिपूर्ण असल्याने त्याची आत्ततत्वेही सुखाचा अनुभव घेत होती. विक्रमाच राजाला त्याच्यासंबंधी सतत विचार करण्याची एक अशी पद्धतच पडून गेली होती.

“काय रे विक्रमा ही विचारांची पद्धत सुद्धा वैशेषिक गुरूंनी, पदार्थविज्ञान गुरूंनी घालून दिली काय तुला?” नेहमी प्रमाणेच विक्रमाच्या मनाभोवती घुटमळणाऱ्या विचारतरंगांना एखाद्या पुस्तकासारख्या वाचणाऱ्या वेताळाने विक्रमाला विचारले.
विक्रमराजा त्याच्या विचारसमाधीतून बाहेर पडत म्हणाला “तसं म्हणू शकतोस तू. खरेतर एकंदर आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील काही गोष्टी आपोआपच विचारात घेतो. पण त्यातून काही मुद्दे सुटून जायची शक्यता असते. वैशेषिक आचार्यांनी बहुधा हाच विचार लक्षात घेऊन ही पदार्थाची ६ अंगे, ९द्रव्ये, ५ हालचाली इत्यादि संख्या निश्चित केल्या असव्यात. हेतू हा असावा की त्यातून पडताळणी करण्यासाठी निश्चित अशी यादी समोर असावी.”

“तू चाललास पुन्हा वाहात..थांबमी तुला जरा दिशा देतो..सर्वांच्याच घरात एक तुळशी वृंदावन असते. घरातील लहान मोठे, स्त्री पुरुष याची वेगवेगळ्यावेळी पूजा करतात. तुळस टवटवीत राहावी याची काळजी घेतात. तर मला सांग की हा तुळशीवृंदावन पदार्थ घेतला तर त्यातील नवद्रव्ये कोणती? त्या पदार्थाची ६ अंगे कोणती? थोडक्यात सांग. पाल्हाळ नको.”
“नवीन काळात कुठली रे तुळशी वृंदावने, पण तरीही लहान लहान कुंड्यांमध्ये तुळशी लावतातच.”



प्रशस्तपाद ऋषींनी द्रव्यांगाची लक्षणे सांगताना म्हटलंय की या द्रव्यांना अस्तित्त्व असते, त्यांना व्यक्त करता येते, त्यांना जाणून घेता येते, त्यांचे काही अन्योन्य संबंध असतात, ती संख्येने अनेक असतात, त्यांना गुण असतात, ते  हालचाली करतात, त्यांचा सजीवतेशी संबंध असतो, त्यांचे वर्गीकरण करता येते, त्यांचे काही विशेष अणुरूप, रेणुरूप अस्तित्त्व असते. त्यातील काही नित्य तर काही अनित्य असतात. काहींचा दुसऱ्यांवर परिणाम होतो तर काही नैमित्तिकच असतात. इतर द्रव्यांच्या निर्मितीला यातील काही कारण ठरतात. यातील काहींमध्ये इतर द्रव्ये आश्रयाला येतात तर काही आश्रयाला जातात. प्रशस्तपाद भाष्याच्या तिसऱ्या धड्यात हे सर्व विवेचन आलेले आहे.”

“विक्रमा, सदर्भ दिलास हे छान झालं. आता आपल्या उदाहरणात परत ये.”

तर या तुळशीच्या कुंडीभोवताली ही नवद्रव्ये कशी बागडत असतात ते पाहू. पहिलं म्हणजे पृथ्वीद्रव्य. तर कुंडी ही या द्रव्याची, आतील काळी किंवा लाल माती ही या द्रव्याची, तुळशीचं शरीर हे सुद्धा या पृथ्वी द्रव्याचं. दुसरं म्हणजे आप किंवा जलरूप द्रव्य. सकाळी पूजेच्या कलशातून वा इतर भांड्यातून हे द्रव्य वाहात वाहात वरच्या थरातून मुळापर्यत गेलं. काही मुळांनी शोषून घेतलं. काही मातीच्या कणांना चिकटलं. राहिलेलं गळून निघून गेलं. कारण वाहणं हा या आपद्रव्याचा गुण. शिवाय तुळशीच्या शरीरातील विविध रस, विकरे(enzymes) ही सुद्धा आपद्रव्याची.”

“विक्रमा, जास्त खोलात शिरु नकोस आत्ता..तेजा बद्दल सांग..”

“हो तर वातावरणात असलेली ऊब, ऊष्णता, मुळांच्या भोवती असणारी ऊब हे सर्व तेजाचे प्रकार. उष्णता, गारवा हे तेजाचे लक्षण. आताच्या शास्त्रानुसार ऊर्जेची विविध रूपे ही सुद्धा तेजरूपच. नंतरचे चौथे द्रव्य म्हणजे आकाशद्रव्य. तर या कुंडीभोवती सूर्यकिरणांतून येणारे विद्युत्चुंबकीय तरंग फेर धरून नाचताहेत ते तरंग म्हणजेच आकाशद्रव्य. शिवाय तुळशी कडे पाहून केलेले सद्विचार, म्हटली गेलेली स्तोत्रे हे शब्दतरंग. हे विविध तरंग म्हणजेच आकाशद्रव्याची उदाहरणे. जितके या आकाशात विधायक तरंग तेवढी प्रसन्नता मोठी..”

“विक्रमा, खोलात नंतर शिरूया रे..ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश द्रव्ये आपण पाहिली..म्हणजे चार भूतद्रव्ये व आकाश हे महाभूत पाहिले..आता दिक् व काल द्रव्यांविषयी सांग..”

“दिक् व काल ही सर्वव्यापी, सर्वसंचारी द्रव्ये. कधीही एका ठिकाणी न राहणारी. आपली घड्याळे ही केवळ कालाचे दर्शक. सकाळी ७ वाजता तुळशीला पूजेनंतर पाणी घातले. ९ वाजेपर्यंत घरातील सर्वांनी या तुळशीला जवळून, लांबून, कधी हात जोडून, कधी मनातल्यामनात असा नमस्कार केला..ऊन वाढल्यावर घरातील गृहिणीने दुपारी पुन्हा थोडे पाणी घातले. त्या आधी थोडे खुरपले. अशाप्रकारे या काळद्रव्याच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी घडल्या..”

“अच्छा म्हणजे कालद्रव्य हे केवळासंदर्भाठीच आहे? ते  स्वत: काहीच करत नाही?”

“नाही. ते केवळ संदर्भाला सहाय्य करते. तसेच काहिसे दिक् याद्रव्याचे. याचा अर्थ जागा. त्याच्याही मोजपट्ट्या माणसाने तयार केल्या. म्हणजे तुळशीच्या कुंडीची उंची इतकी, परिघ इतका, तिचे आकारमान इतके. तुळशी आणली तेव्हा एक वीत होती. आता एक फुटाची झाली असे दिक् द्रव्याचे विविध निर्देशक वेगवेगळ्या संदर्भात  येऊन चिकटतात व संदर्भ बदलल्यावर निघून जातात. अशाप्रकारे दिक् ही सुदरी मोजपट्टी. केवळ संदर्भाला साहाय्य करणारी..”

“आता मन व आत्मा..”

“या द्रव्यांसंबंधी स्थूलार्थाने काय बोलावं. कुंडी उचलताना हाताचा जिथे कुंडीशी संयोग झाला तेथे मन येऊन गेलं. नमस्कार करताना, पाहताना पाहणाऱ्याचं मन या तुळशीजवळ आलं व क्षणात उडून दुसरीकडे जाणाऱ्या फुलपाखरासारखं हे मनही दुसरीकडे उडून गेलं..”

“म्हणजे विक्रमा स्थल, काल, मन ही सर्वच अशी संदर्भाबरोबर उडणारी व बसणारी फुलपाखरं आहेत..त्यांचा काहीही परिणाम होत नाही तुळशीवर..”

“वेताळा स्थळ व काळ हीच नैमित्तिक आहेत. पण मनाला शक्ती आहे. मनामध्ये कार्यकारी शक्ती आहे. घरातील कोणी व्यक्ती या तुळशीची प्रसन्नतेने पूजा करत असेल, विधायक विचार करत असेल तर त्या विचारतरंगांमुळे तुळस तजेलदार दिसेल..ती मने ज्या सजीवांशी संबंधित असतात त्यांची आत्मद्रव्येही त्या तुळशीशी निगडित होतात..सुख, दुख, इच्छा, द्वेष हे या आत्म्यांचे गुण..”

“विक्रमा, आत्म्याविषयी तू मला सांगतोस? आत्मा हा सुद्धा न दिसणारा आहे. त्याला देहाश्रयाशिवाय व्यक्त होता येत नाही. म्हणून तर दर अमावस्येला या मृतशरीरात मला प्रवेश करावा लागतो..पण विक्रमा या तुळशी भोवती चालणाऱ्या विविध द्रव्यांच्या खेळासंबंधी सांगून त्यांच्या गुण या अंगाविषयी जाणण्याची उत्सुकता तू अधिकच ताणलीस..पण आता या मृतशरीराचा आश्रय सोडून जाण्याची वेळ झाली..पुन्हा भेटायचंय राजा..विसरू नकोस..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

झालं..वेताळ गेला तसं आजुबाजूचे सारे स्थिरचर दर अमावस्येप्रमाणेच विचार मंथनात रममाण झाले.. 

“दर अमावस्येला झाकोळला जाणारा चंद्र सुद्धा आपल्याकडे कुणा आत्म्याचं लक्ष नाही हे पाहून स्वत:मधील द्रव्यांचा विचार बहुतेक करू लागला असावा..”त्या रात्री विक्रमा बरोबर आलेल्या राजकवीचने आपली कल्पना बोलून दाखवली..

विक्रमाने स्मितहास्य केलं व म्हणाला “राजकवीच तुम्ही..तुमचा आत्मा कल्पनारंजनाने तृप्त होतो..उद्याच्या सभेत यावर एक उत्तम काव्य तुम्ही ऐकवाच..”

“महाराजांची आज्ञा शिरसावंद्य..” राजकवींनी दुजोरा देत प्रणिपात केला..

विक्रमाने सारथ्याला प्रस्थान करण्याची आज्ञा दिली..अमावस्येचा अंधार आजुबाजूला असला तरी त्या सारथ्याच्या मनातला एक कोपरा ज्ञानाने उजळला होता..  


(क्रमश:)