Showing posts with label inherence. Show all posts
Showing posts with label inherence. Show all posts

Friday, 12 January 2018

पदार्थाच्या अंतरंगाचा म्हणजे वर्गीकरण, विशेष व समवाय या अंगांचा परिचय (Getting to the real nature of Padarth by studying its classification, individualities and concommittant relations)

पदार्थाच्या द्रव्य, गुण व कर्म इत्यादि बदलणाऱ्या किंवा अनित्य अंगांची चर्चा तर झाली. पण त्यामुळे पदार्थाची ओळख मात्र नाहीच झाली. उलट केवळ बाह्यांगाचीच ओळख झाल्यामुळे तर अंतरंग काय असेल या विषयी अधिकच उत्सुकता ताणली गेली. हे म्हणजे एखाद्या माणसाची वर वर ओळख झाल्यावर तो जसा दाखवतो तसाच कलाकार आहे का शत्रुराष्ट्राचा हेर आहे हे कळण्याइतकं अवघड पण तरीही अतिमहत्त्वाचं काम. काही अतिशय सुंदर दिसणाऱ्या वनस्पती या किटकांना आकर्षून घेतात व नंतर गिळंकृत करतात. उलट कोरफड, निवडुंगांसारख्या वरवर अतिशय राठ, कोरड्या वाटणाऱ्या वनस्पती आतून असतात ओलसर. सुंदर दिसणारी  फळे विषरी निघावीत व फणसासारखी अतिशय कुरूप फळे आत मात्र गोड निघावीत. असा प्रकार सृष्टीत सर्वत्रच पाहायला मिळतो. तो सर्व बाजूने विचार करतो म्हणजे बाह्य व अंतरंगांचा समतोल समन्वय साधू शकतो तोच पदार्थाला समजू शकतो व त्या पदार्थाची योग्य योजना करू शकतो..

विक्रमाच्या अंतरंगामध्ये असे विचार तरंग उमटंत असताना वेताळाचे धूड त्याच्या खांद्यावर येऊनही पडले. “काय राजा..तू राजासारखाच विचार करणार हे मला माहित आहे. प्रत्येक पदार्थाची तुझा राज्यशकट हाकण्याच्या कामी योजना करणं हा तुझा स्थायीभावच आहे. ते जाऊ दे. मला आज पदार्थाच्या नित्य म्हणजेच न बदलणाऱ्या अंगांची माहिती दे. आणि हो त्यात चांगली उदाहरणेही दे.”

“होय वेताळा..मागे एकदा आपण पाहिलं त्याप्रमाणे प्रशस्तपाद ऋषींनी म्हटलंय..
षण्णामपि पदार्थानामस्तित्त्वाभिधेयत्वज्ञेयत्वानि |11|
To all the six categories belong the properties of being-ness, predicability and congnisability.
पदार्थाच्या साही अंगांमधले साम्य म्हणजे त्यांना अस्तित्व असते, शब्दांत व्यक्त करता येते व ती जाणून घेता येऊ शकतात. नित्य अंगांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सामान्य म्हणजे पदार्थ कोणकोणत्या गटात मोडतो, विशेष - त्याचं विशेष अस्तित्व काय आणि समवाय - त्याचे अतूट संबंध कोणते या गोष्टी त्या पदार्थाच्या अस्तित्त्वाशी संबंधित आहेत, त्यांना तुम्ही जाणून घेऊ शकता व त्यांचं शब्दांत वर्णन करु शकता.”

“हा समवायित्व संबंध फार महत्त्वाचा दिसतो वैशेषिकांत. पण मग काय या तिन्ही अंगांचे असे अविभाज्य संबंध असतात? शिवाय ही नित्य अंगे संख्येने किती असतात..सोप्या शब्दात सांगायचं तर किती गट पडू शकतात पदार्थांचे? त्यांचे विशेष किती असू शकतात? ”

“वेताळा, प्रशस्तपादांनी सांगितलंय..
द्रव्यादीनां पञ्चानां समवायित्वमनेकत्वञ्च  ||13||
To the five, Substance and the rest, belong the characters of inherability and plurality.
द्रव्ये, गुण, कर्म, गट व विशेष हे संख्येने अनेक आहेत व ते अविभाज्य घटकांचे बनलेले असतात.
याठिकाणी बोलायचं झाल्यास पदार्थाचे वर्गीकरण(classification) तुम्ही अनेक गटांमध्ये गरजेनुसार करू शकता. शिवाय विविध गटांचे व विशेष अंगांचे समवायित्व संबंध अनेक असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास ‘धातू(metal)’ हा एक गट घेतला तर या गटातील बऱ्याचशा द्रव्यांची समान व अविभाज्य लक्षणे असतात. तन्यता(ductility), वर्धनीयता(stretchebility), विद्युतवाहकता(electric conductivity), उष्णतावाहकता(heat conductivity), चकाकी(glaze) ही बऱ्याचशा सोने, चांदी, तांबे, अल्युमिनियम इत्यादि धातूंची लक्षणे असतात. किबहुना या लक्षणांवरूनच तेथे वर सांगितलेल धातू आहेत हे कळतं. हे झाले गटाचे समवाय संबंध. आता विशेष अंग पहायचं झाल्यास त्या अंगाचा त्या पदार्थाशीच समवाय संबंध असतो. पाणी हे नेहमीच्या द्रव अवस्थेत असो, थंड केलेल्या बर्फाच्या म्हणजे स्थायु अवस्थेत असो किंवा वाफेच्या म्हणजे वायुरूपात..जोपर्यंत पाण्याचा मूलकण किंवा रेणू तिथे अस्तित्वात आहे तो पर्यंतच तिथे पाण्याचे अस्तित्त्व आहे. म्हणूनच विशेष अंग ही त्या पदार्थाची खरी ओळख आहे व त्या पदार्थाच्या रोमारोमांत भरलेली आहे. हा झाला विशेषाचा त्या पदार्थाशी असलेला समवाय किंवा अतूट संबंध.”

“विशेष अंग ही अस्तित्वाची ओळख(unique identity)! मग या गटवारीचे, विशेषाचे व समवाय संबंधांचे काही गुण असतील?”

“नाही वेताळा. पदार्थाचे सर्व गुण हे द्रव्याकडूनच येतात. आधी सांगितल्या प्रमाणे..
गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे ||14||
To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.
फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात. गुण, कर्म, सामान्य, विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही गुण नसतात.”

“आलं लक्षात. आधी द्रव्य ओळखायचं, मग बाह्यांग कळतं. मग त्याच्या गुणाचा व कर्माचा मागोवा घ्यायचा. पण मला सांग की ही ३ नित्य अंगे आहेत – गट, विशेष व समवाय – ती सगळ्या द्रव्यांमध्येच आढळतात?”

“हा खूपच महत्त्वाचा मुददा आहे वेताळा. गट, विशेष व समवाय ही अंगे सर्व द्रव्यांमध्ये असतात. मागील वेळी अनित्य अंगांचा अभ्यास करताना आपण म्हटलं होतं..
द्रव्याश्रितत्वञ्चान्यत्र नित्यद्रव्येभ्य:  ||18||
The character of subsisting in substances (belongs to substances, qualities and actions) with the exception of eternal substances.
द्रव्य, गुण व कर्म यांना फक्त अनित्य द्रव्यांमध्येच आश्रय मिळतो. याचा दुसरा अर्थ हा की गटवारी, विशेष व समवाय ही अंगे नित्य व नित्य दोन्ही प्रकारच्या द्रव्यांना लागू पडतात. म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिक्, मन व आत्मा या सर्वांचे आपण गट पाडू शकतो, सूक्ष्मस्तरावर जाऊन विशेष पाहू शकतो. तसेच या नऊही द्रव्यांचे काही ना काही अतूट संबंध असतात.”

“अच्छा म्हणजे तरंगरूप आकाश, काल, दिक्, मन व आत्मा यांचे आपण गट पाडू शकतो?”

“होय वेताळा, तरंगांचे पूर्वीपासूनचे गट म्हणजे शब्द व वर्ण. आता नवीन शास्रानुसार तर त्यांमध्ये अवरक्त(infrared), अतिनील(ultraviolet), विद्युत्चुंबकीय(electromagnetic) असे नानाविध गट आले आहेत. काल व दिक् हे तर तसे नैमित्तिकच असतात. पण तरीही मोजण्याच्या गरजांमधून सूक्ष्मकालापासून दीर्घकालापर्यंत अनेक गट असतात. तेच स्थलाचे, सूक्ष्मापासून, अणूपासून, त्रासरेणू पासून सूर्यादि माहाकाय पदार्थांपर्यंत अनेक गट. तीच गत मनांची व आत्त्म्यांची.”

“विक्रमा या नित्य अंगांमध्ये काही साम्यस्थळे आहेत काय?”

“वेताळा, प्रशस्तपाद ऋषींनी याविषयी एक श्लोक सांगितला आहे..त्यात या नित्य अंगांमधली साम्यस्थळे सांगितली आहेत..
सामान्यादीनां त्रयाणां स्वात्मसत्वं बुद्धिलक्षणत्वमकार्य्यत्वमकारणत्वमसामान्यविशेषवत्वं नित्यत्वमर्थशब्दानभिधेयत्वञ्चेति ||19||
The three beginning with generality have the character of having their sole being within themselves, having Buddhi or the Cognitive Faculty as their sole indicator of not being an effect, of not being the cause, of having no particular generalities, of being eternal, of not being expressible by the word ‘artha’.
सामान्य, विशेष व समवाय ही अंगे स्वयंभू असतात, बुद्धी हेच त्यांना जाणण्याचे साधन असते, ते दुसऱ्या कशाच्याही निर्मितीला कारण बनत नाहीत, त्यांचा विनाश होत नाही व दुसऱ्या कशाही मुळे त्यांना अर्थ प्राप्त होत नाही.”

“उदाहरण दे रे विक्रमा.”

“हे बघ वेताळा, मागील वेळी आपण हत्ती व सिंह यांविषयी बोललो होतो. गट पाहिला तर हत्ती व सिंह दोघेही वन्य पशू. पण त्यांच्या खाण्याचा संबंध आला तर हत्ती शाखाहाराशिवाय काही करणार नाही तर सिंहाची गुजराण मांसाहाराशिवाय होणार नाही. त्यांच्या अस्तित्त्वाशी त्यांच्या या ओळखीचा संबंध आहे. हे झालं सामान्य अंग..ते कळायला सिंहाला प्रत्यक्ष खाताना पाहायची गरज नाही. दुसऱ्या कुणा अधिकारी व्यक्तीकडून ते बुद्धीने जाणता येतं. शिवाय एका विशिष्ट सिंहाला नव्हे तर सर्वच सिंहाना ते लागू होतं. पण त्यामुळे मांसाहार करणाऱ्या प्राण्याला वा पहाणाऱ्याला काही फरक पडला नाही. हे वर्गीकरण आपण आपल्यासाठी केलं. सिंहाचं मांसाहारी असं वर्गीकरण झालं की ते बदलंत नाही. शिवाय सिंहामुळे वर्गीकरणाला काही विशेष अर्थ प्राप्त होत नाही. उलट सिंह मांसाहारी आहे असं म्हटलं की सिंहाला मात्र अर्थ प्राप्त होतो.”



“आता विशेष अंगाचं सांग..”

“हे बघ वेताळा, अनेक गोष्टींमध्ये नीरक्षीरविवेक हा शब्द येतो. म्हणजे मिश्रित पाण्यातून राजहंस पाणी व दूध वेगळं काढतो म्हणतात. म्हणजेच दोन विशेष किंवा दोन द्रव्ये शोधून काढतो. आता त्याच्या पुराव्याविषयी फारसं काही माहिती नसल्याने एक साधा प्रयोग करू..जो गृहिणी रोज करतात..”

“कोणता प्रयोग?”

“वेताळा, घरी येणाऱ्या पाण्यात अनेक वेळा माती मिसळलेली असते. गृहिणी हे पाणी पातेल्यात साठवतात व काही काळ स्थिर ठेवतात. यामुळे होतं काय की पाण्यातील माती ही गुरुत्वामुळे खाली बसते व पाणी काही अंशी स्वच्छ होते. याही पुढची पायरी म्हणजे त्या पाण्यावर तुरटी फिरवतात. ही तुरटी पाण्यातील विरघळलेल्या सूक्ष्मस्थायूंना चिकटते व तळाशी घेऊन जाते. यामुळे वर वर निर्मळ वाटणारे पाणी व खरे शुद्धपाणी यांत फरक ओळखता येतो.”

(photo credit: wisdonsurf.blogspot.com)

“विक्रमा वरील श्लोकाशी या विशेष अंगाचा पडताळा दे..”

“बर..कोणत्याही पदार्थाचा विशेष हा तो पदार्थ जेव्हा आकाराला येतो तेव्हाच बरोबर आलेला असतो. पाण्याचा विशेष रेणू वेगळा. मातीचा रेणू वेगळा. पण तो दरवेळी प्रयोगाने सिद्ध करावा लागत नाही कारण ते अधिकारी व्यक्तींनी पुराव्याने सिद्ध केलेले आहेत. शिवाय हा रेणू स्वत:हून काहीही करायला जात नाही. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या द्रव्यांच्यावर त्याचे वर्तन बदलते.”

“अच्छा म्हणजे मागील वेळी उष्णता क्षयमान(entropy) म्हटलास तसं..बर पुढे बोल..”

“शिवाय त्या गढूळ पाण्यातून आता तुरटीमुळे पाण्याचा रेणू व मातीचा रेणू वेगवेगळे झाले तरी स्वत: त्या रेणूला काहीच फरक पडला नाही. आधी पाण्याशी संयोग(association) झाला होता, आता वियोग(disassociation) झाला इतकंच. शिवाय या रेणूंचा अभ्यास मी केलेला आहे व तो या पातेल्यातल्या रेणूंना मी लावून पाहतोय. या अर्थी या पातेल्यातल्या पाण्यामुळे रेणूसंबंधीच्या ज्ञानात भर पडत नाहीये, पण फक्त पडताळा मिळतोय व त्या आधारे मी पाणी शुद्ध करु शकतोय.”

“वेताळा, प्रत्येक माणसाच्या शरीराचे विशेष हे त्याच्या गुणसूत्रात(genes) असते..किंबहुना नवीन संशोधनात जो डि. एन. ए.(DNA) हाती लागला आहे तो त्या मानवाच्या शरीराचा विशेष होय. पण वैशेषिकानुसार तर हा मानवाच्या भूतरूप शरीराचा(material body) विशेष होय. पण मानवाशी संबंधित कंपने(waves), काल(time), दिक्(space), मन(mind) व आत्मा(soul) या सगळ्याचा त्या डिएनए शी संबंध लावल्याशिवाय त्या मनुष्याचा विशेष हाती लागत नाही. तू म्हटलास ती वर्गीकरणे आहेत वेगवेगळ्या संदर्भात वापरलेली..”

 “बर..बर..पण विक्रमा ह्या तीन अंगांद्वारे व त्यातून निर्माण होणाऱ्या अतूट संबंधाद्वारे तू पदार्थाचे अंतरंग कसे जाणणार ते सांग..”

“यातील एक उदाहरण तर खालील श्लोकातच आहे..
काक: काक: पिक: काक: को भेद पिककाकयो:‌|
वसंत समये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ||
याचा अर्थ असा की कावळा काळा, कोकिळ ही काळा. असा एक कावळा व एक कोकिळ गप्पपणे शेजारी-शेजारी बसले आहेत त्यांच्यात फरक कसा ओळखावा? कवी म्हणतो..एकदा वसंत येऊदे.. कोकिळ कोण व कावळा कोण हे वेगळ ओळखत बसावं लागत नाही. काव काव आवाज ऐकला म्हणजे तो कावळाच आहे व कुहुकुहु असा आवाज ऐकला म्हणजे तो कोकिळच आहे हे कळते. हा समवाय संबंध आहे.”

“विक्रमा हा श्लोक छान आहे. पण काही नवीन उदाहरण?”

“फारसं नवीन नाही पण तुला लगेच पटेल असं उदाहरण देतो. एका वाटीत माती आहे, लाकडाचा काळा भुस्सा आहे व लोखंडाचा किस आहे. आता यातील लोखंडाचा किस लोहचुंबकाकडे आकर्षित होतो हा त्याचा अतूट संबंध. त्यामुळे त्या मिश्रणावरून लोहचुंबक फिरवला तर लोखडाचा चुरा चुंबकाला येऊन चिकटतो. त्यामुळे पदार्थाचे खरे स्वरूप प्रकटते. वेताळा याही ठिकाणी हे लोखंडाचे चुंबकाला चिकटणे हा त्याचा स्वयंभू गुण आहे. तो कोणी शिकवलेला नाही. तसेच या स्वयंभू वागण्यामुळेच हा चिकटणारा किस लोखंडाचाच आहे हे प्रयोगा अंती सिद्ध झालेले आहे. दरवेळी तो प्रयोग पुन्हा पुन्हा करावा लागत नाही. तसेच जगात सगळीकडेच लोहकीस लोहचुंबकाला चिकटतोच चिकटतो. इथं काही वेगळं चाललेलं नाहिये. हो, त्या ज्ञानाचा पडताळा मात्र मिळतोय.”



“अच्छा म्हणजे विक्रमा, या पदार्थाच्या नित्य अंगांचा वापर करून तुम्ही त्यातील घटक वेगवेगळे करू शकता व हवे ते घेऊन नको ते टाकूही शकता. तू म्हटलास तसं पदार्थाची ही सारी अंगे त्यातील द्रव्यावर आधारित असतात. मग आता मला भूत द्रव्य व नित्यद्रव्यांविषयी माहिती हवी. अरेऽ पण हे काय? प्रहर संपला. मला परत जायला हवं. पुन्हा भेटू विक्रमा द्रव्यांची चर्चा करण्यासाठी..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

सर्वच प्रजाजनांसाठी फार महत्त्वाचा असा हा संवाद होता..जाती, कुळे, गोत्रे ही वेळोवेळी केलेली वर्गीकरणे पण प्रत्येक माणूस वेगळाच असतो हे एकून प्रजाजनच काय पण सारे पशुपक्षीही अचंबित झाले व सुखावले..
तुम्ही अमृताचे पुत्र आहात..

असा प्रगल्भ विचार देणाऱ्या वैदिक धर्माची व विसाव्या शतकात त्याची कीर्ती साता समुद्रापार नेणाऱ्या स्वामी विवेकानंदांची सर्वांना प्रकर्षाने आठवण झाली.

(क्रमश:)

Saturday, 30 December 2017

पदार्थात होणाऱ्या भौतिक बदलांचा अभ्यास (Appreciating the physical changes in substances)

बदल हा तर निसर्गाचा स्वभाव गुण..सतत बदलत राहणं, जुन्याच्या जागी नवं घेणं, नवी पालवी फुटणं. नवेपणा जाऊन जीर्णपणा येणं. उन्हा मागून पाऊस, पावसानंतर शिशिर, मग शरद असं फेर धरून चालणं हे निसर्गाचं नित्याचं काम. काही बदल होत राहतात. यातील काही कायम टिकतात. काही तात्कालिक व पुन्हा मागील पाढे पंचावन्न. नदीच्या पाण्यात घासल्या जाणाऱ्या दगडांचे क्षार मिसळून नष्ट झाले म्हणता म्हणता उन्हाळ्यात नदी कोरडी झाली की क्षारांनी पुन्हा आपलं डोकं वर काढाव. एखाद्या टपून बसलेल्या शत्रूने संधी येताच डोकं काढावं तसं.

“विक्रमा खरंच मला तर ह्या बदलांचं काही कळेनासंच झालंय बघ. पाण्यात मीठ मिसळाव. मग ते नष्ट झाल्याचं वाटून पाणी मात्र खारट झालेलं असतं. पुन्हा त्या पाण्याला उकळलं तर पाण्याचं बाष्प व्हावं व मीठ खाली राहावं..ही काय भानगड आहे? ह्या बदलाला कारण झालं कोण? स्पर्श किंवा तापमान बदललं कशामुळे?”

“वेताळा, तेजाचा तापमानाशी समवाय संबंध आहे असं आपण मागच्या एका अमावस्येला बोललो होतो. तापमानात घट झाली म्हणजे तेज गुण बदलला. प्रशस्तपाद म्हणतात
कारणत्वञ्चान्यत्र पारिमाण्डल्यादिभ्य: |
The quality of being the cause belongs to all (substances, qualities and actions) except the atomic measure.
दुसऱ्या कशालातरी कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.”

“नाही, म्हणजे ते ठीक आहे. पण हे विशेष अंग सोडून बाकी अंगे ते पदार्थ बदलतात कधी? आणि कोण त्यांना बदलतं?”

“अगदी बरोबर ठिकाणी नेम धरतोयस वेताळा..वर सांगितल्या प्रमाणे पदार्थाची सर्व अंगे ही द्रव्यांमुळेच असतात. म्हणूनच हा बदल सुद्धा कोणत्यातरी द्रव्यानेच होतो. याचा अर्थ असा होतो की पदार्थातील द्रव्ये ही त्यातील इतर द्रव्यांवर परिणाम घडवून आणतात. वर मी सांगितलंच आहे तेज गुण पाण्यावर कसा परिणाम करतो ते.”

“पण विक्रमा हा बदल घडवतं कोण?”

“वेताळा मागे सुद्धा मी हे सांगतलं होतं. प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय
गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे |
To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.
फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात, सामान्य संभवतात, विशेष असतात व समवाय संबंधही असतात. पण द्रव्यांशिवाय गुण, कर्म, सामान्य,विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही अस्तित्त्व उरत नाही. 

याचा एवढाच अर्थ होतो की पदार्थातील पृथ्वी, आप, तेज, वायू व मन ही द्रव्ये एकमेकांवर परिणाम करत असतात. स्थल, काल ही केवळ नैमित्तिक आहेत. प्रशस्तपाद ऋषी म्हणतात
क्षितिजलज्योतिरनिलमनसां क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि ||
To Earth, Water, Fire, Air and Mind belong the character of having actions, being corporeal, having distance and proximity, and having speed.
स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना मूर्त स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.

“अच्छा म्हणजे ही द्रव्ये बलप्रयोगाने बदल घडवतात...पण विक्रमा हे बदल कुठपर्यंत?”

“वेताळा हीच ती भौतिक व रासायनिक बदल यांमधील सीमारेषा..पदार्थात होणारा बदल जोपर्यंत त्याचा विशेष कायम ठेवतो म्हणजे पाण्याचा रेणू हा कायम राहतो तोपर्यंत तो भौतिक बदल(physical change). लाकडाच्या ओंडक्याचे तुकडे करत गेलो तर तोही भौतिक बदल. कारण या दोन्ही उदाहरणात पाणी किंवा लाकडाचा विशेषकण हा पाण्याचा रेणू व लाकडातील लहानात लहान रेणूच राहिला. पण मी जर ते लाकुड शेकोटीला वापरले तर तो भौतिक बदल राहिला नाही कारण लाकडाची राख झाली व उष्णता बाहेर पडली. लाकडाचं विशेष अंग बदललं व राख निर्माण झाली. हा झाला रासायनिक बदल(chemical change).”

“अच्छा म्हणजे पदार्थाचे विशेष अंग कायम राखून बाकी द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय संबंध यांमध्ये जर बदल झाला तर तो झाला भौतिक बदल. पण जर पदार्थातला हा बदल विशेषत्वाला बदलून गेला तर त्या पदार्थाचे मूळच बदलले व त्यात रासायनिक बदल झाला असे आपण म्हणू शकतो.”

“एखादे उदाहरण देतोस विक्रमा?”

“म्हणजे पाणी, साखर, चहा यांच्या मिश्रणाला उष्णता दिली तर तो एक भौतिक बदल झाला. पण याच मिश्रणात दूधही ओतलं व ते नेमकं नासलं तर त्या दुधात रासायनिक बदल झाला व तो चहाच वाया गेला.”

“असं असं..पण या द्रव्यांच्या गुणांमध्ये फरक झाल्याने इतरांवर परिणाम होतोय हे खरंय. पण हे सगळं करतंय कोण? कशासाठी?”

“पाश्चात्य भौतिकशास्त्रामध्ये एखाद्या बाह्यबलावर यासर्वाची जबाबदारी ढकलली जाते. पण वैशेषिकात या बाह्यबलासोबतच मन व आत्मा ही द्रव्ये असल्याने हे बदल घडवण्याची जबाबदारी साहजिकच आत्म्यावर येऊन पडते. आत्म्याचे बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष व प्रयत्न हे गुण सांगितले आहेत. शिवाय त्याला हेतु सुद्धा असतो. या हेतूवरही या भौतिक तसेच रासायनिक बदलांची जबाबदारी येऊन पडते. हा आत्मा मनाच्या सहाय्याने हे प्रयत्न करतो. वैशेषिकात मनाचे संख्या(number), परिमाण(unit), पृथकत्व(separateness), संयोग(conjunction), विभाग(disjunction), परत्व(largeness), व अपरत्व(smallness)  हे गुण सांगितले आहेत. आत्मा हा या अवयवांमधील पेशींच्या सहाय्याने हे बदल करतो किंवा तसा प्रयत्न तरी करतो.”


“सूत्ररूपात सांगायचं तर कसं बरं सांगशील विक्रमा?”

“तसं वैशेषिकात तर तसं थेट सूत्र नाही, पण संक्षेपात सांगायचं झाल्यास
  • पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यात बदल झाला पण विशेष बदललं नाही, तर तो भौतिक बदल
  • पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यातील कोणत्याही बदलासह विशेष अंगात बदल झाला तर तो रासायनिक बदल.”




“चांगला प्रयत्न आहे विक्रमा..पदार्थविज्ञानात असलेले हेतूचे स्थान सांगण्याचा. पण आता या ठिकाणी मला थांबता येणार नाही. तसा प्रयत्नही करु नकोस. मला जावंच लागेल. आत्मा तर माझ्यातही आहे. फक्त भूतद्रव्ये नाहीत तुझ्या शरीरात आहेत तशी. असो. पण पदार्थाच्या अवयवांना जाणवणाऱ्या द्रव्य, गुण व कर्म या अंगांमध्ये काही साम्ये आहेत का? प्रशस्तपादांनी त्याबाबतीत काही म्हटलंय का? तेच सामन्य, विशेष व समवाया संबंधातही विचारायंय..त्यांच्यातही काही समानता आहे का? पण आता मी निघतो. पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

वेताळही पदार्थविज्ञानाच्या कक्षेत येतो..निदान तो तसं म्हणतो हे पाहून जंगलातील इतर अदृष्य आत्म्यांनीही कान टवकारले. विक्रम वेताळाच्या गोष्टींचा पोरकटपणा म्हणून उपहास करणारे ते आत्मेसुद्धा पुढच्या अवसेची व त्यांच्या भेटीची वाट पाहू लागले..


(क्रमश:)

पदार्थाच्या सहा अंगांच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची? (Getting started with the study of the six facets of Padartha)

राजा विक्रमाची आणि वेताळाची भेट ही केवळ विक्रमासाठी किंवा प्रजाजनांसाठीच नव्हे तर जंगलातल्या सर्व स्थिर चरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरू लागली होती. कारण त्या भेटींमध्ये आता पदार्थविज्ञानाच्या मुख्यत: वैशेषिक पदार्थविज्ञानाच्या आधारस्तंभांविषयी – म्हणजे द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(actions), सामान्य(classification), विशेष(individuality) व समवाय(inherence) – या पदार्थाच्या सहाअंगांविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली होती. जणू लोकांच्या हातात कोणीतरी खजिन्याच्या चाव्याच दिल्या होत्या. पण या चाव्यांनी कुठलं कुलुप उघडतं हे कळत नव्हतं. शिवाय यातील पहिलं कुठलं अंग तपासायाचं, या सहा अंगांमध्ये काही साम्य आहे का? वगैरे अनेक प्रश्न आता वैशेषिकात रस घेऊ लागलेल्या जिज्ञासूंना पडू लागले होते.

“काय रे विक्रमा, पदार्थाची सहा अंगे सांगितलीस, उदाहरणेही सांगितलीस, पण या अभ्यासाची सुरुवात कशी करायची हे सांगितलंच नाहीस? अभ्यास करताना पहिलं द्रव्य पहायचं का गुण हे पण नाही सांगितलंस..”विक्रमाच्या शक्तिवान खांद्यावर आरूढ होत वेताळाने त्याच्या प्रश्नाची सरबत्ती सुरु केली.

“वेताळा एखाद्या वस्तूला मग ती जमीन, पाणी, ऊन यांसारखी इंद्रिय गोचर असो वा तरंग, स्थल, काल, मन इत्यादि बुद्धीला कळणारी असो, त्या वस्तूला जेव्हा माणसाने अभ्यासायला सुरुवात केली, तस तसे त्याला वेगवेगळे अर्थ प्राप्त व्हायला सुरुवात झाली. प्रशस्तपादांच्याच शब्दांत

षण्णामपि पदार्थानामस्तित्त्वाभिधेयत्वज्ञेयत्वानि |11|
(To all the six categories belong the properties of being-ness, predicability and congnisability.)
पदार्थाच्या साही अंगांमधले साम्य म्हणजे त्यांना अस्तित्व असते, शब्दांत व्यक्त करता येते व ती जाणून घेता येऊ शकतात.

म्हणजेच पदार्थातील द्रव्ये, गुण, कर्मे इत्यादि सहा अंगांद्वारे त्या वस्तूला विविध अर्थ प्राप्त होतात व माणूसच त्याला पदार्थ म्हणजेच 'विविध अर्थ प्राप्त असलेली वस्तू' करून टाकतो. अजाणतेपणाकडून जाणतेपणाकडे जायचा हा प्रवास.”

“उदाहरण दे रे उदाहरण..”

“ समजा एक सैनिक लढतालढता शत्रुदेशाच्या सीमेलगत आलाय. गुप्तचरांनी सांगितल्यानुसार सर्वत्र भुसुरुंग तसेच तापलेले लोहगोळे पडलेले आहेत अशी त्याला खबर आहे. प्रत्येक पाऊल तो सावधपणे टाकतोय.  समोर एखादी अज्ञात वस्तू पडलेली आहे..ती टणकशी वाटतेय, राखाडी मातीपासून वेगळी दिसतेय, लोखंड वगैरे एखादा धातूच असावा पण रंगावरून तर तसे वाटत नाहिये..मग लक्षात येते की तप्त लोखंड हे जरा लालसरपणाकडे झुकते..हे झालं तोफगोळे हुडकण्याविषयी..भुसुरंगासाठीही तो प्रत्येक ठिकाणी चाचपत पुढे जातो..जमीन सगळीकडे सारखीच टणक आहे, का काही ठिकाणी तो टणकपणा कमी जास्त होतोय, रंग बदलतोय हे तो पाहात जातो. म्हणजेच तो पहिल्यांदा  द्रव्य ओळखतो, मग त्या द्रव्याचे गुण, मग हालचाली, मग ते द्रव्य कुठल्या गटात मोडते, शिवाय त्या द्रव्याचे विशेष काय आणि त्या मग ते द्रव्य पदार्थाचे अविभाज्य घटक आहे का कसे हे पाहतो..कारण या श्लोकातच म्हटल्याप्रमाणे या सहाही गुणांना काही विशिष्ट अस्तित्व असते, ती जाणून घेता येतात व ती शब्दांमध्ये व्यक्तही करता येतात..”




“अरे उदाहरणातच रममाण झालास..पण हे सांग की ही द्रव्ये आहेत की नाहीत हे कसे कळायचे?”

“वेताळा प्रशस्तपाद ऋषींनी म्हटलंय
‌आश्रितत्वञ्चान्यत्र नित्यद्रव्येभ्य:||12||
The character of being dependant (upon something else) belongs to all things except the eternal substances.
स्थायू (solid), द्रव(liquid), तेज (energy), वायू(gas) ही भूतद्रव्ये इतरांवर अवलंबून असतात. आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind) ही महाभूतद्रव्ये इतरांवर अवलबून नसतात.

आपल्या गोळ्याच्या उदाहरणात लोखंड हे पृथ्वीद्रव्य व उष्णता हे तेजद्रव्य ही भूतद्रव्ये आहेत. ही द्रव्ये इतर घटकांवर अवलंबून असतात. म्हणजे पृथ्वीरूप हे तेजावर अवलंबून आहे. हाच गोळा सूर्यावर असता तर तेथील तेजरूप उष्णतेमुळे तर ते आकाशरूपात(plasma) अवस्थेत असते. पण हे अवलंबित्व फक्त पृथ्वी, आप, तेज व वायू यांनाच लागू पडते. बाकीची द्रव्ये म्हणजे आकाश, काल, स्थल, मन व आत्मा ही इतरांवर अवलंबित किंवा आश्रित नसतात.”

“म्हणजे या ठिकाणी तू स्वतंत्र व परतंत्र द्रव्ये सांगितलीस. भूते ही एकमेकांवर अवलंबून असणारी द्रव्ये आहेत व महाभूते ही स्वतंत्र आहेत असे तू म्हणतोस. पण ही द्रव्ये तिथे आहेत हे मुळात कळतंच कसं?”

“अरे वेताळा, द्रव्य ओळखण्यासाठी त्याचा गुणच ओळखावा लागतो. हा गुणच ते द्रव्य तिथे आहे हे सांगतो. या अतूट संबंधालाच समवाय संबंध म्हणतात. या समवायामुळेच तर द्रव्य कळतं..माणसाला पदार्थाचं तापमान जाणवलं की तिथे उष्णता किंवा तेजद्रव्य आहेच हे कळतं. आवाज आला की आकाश द्रव्य कळतं. असे या पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व विशेष यांमध्ये कुठल्यानाकुठल्या प्रकारचे समावाय वा अतूट अन्योन्य संबंध अस्तित्त्वात असतातच. प्रशस्तपाद म्हणतात
द्रव्यादीनां पञ्चानां समवायित्वमनेकत्वञ्च  ||13||
To the five, Substance and the rest, belong the characters of inherability and plurality.
द्रव्ये, गुण, कर्म, गट व विशेष हे संख्येने अनेक आहेत व ते अविभाज्य घटकांचे बनलेले असतात.

जसं आपण पाहिलं तसं द्रव्ये ९ आहेत. त्यांचे एकुण २४ गुण आहेत. त्यांच्या हालचाली या ५ मुख्य प्रकारच्या आहेत. शिवाय त्यांचे गट तर अनेक आहेत. शिवाय त्या पदार्थांचे विशेषगुण म्हणजे लहानात लहान कण हे त्यांमधील द्रव्यांनुसार अनेक आहेत. शिवाय आपण आधी म्हटलं तसे त्यांमध्ये समवाय संबंधही आहेत.”

“हे ठिक आहे रे विक्रमा, पण हा समवाय का काय त्याचा जरा आधुनिक संदर्भ दे रे..स्पष्ट कर जरा..अनेक समवाय संबंध कसे ते ही सांग”

“समजा आधुनिक युगातला भ्रमणध्वनी आहे तुमच्याकडे. तर त्यावर असलेली माहिती म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यामध्ये काय अत्यावश्यक आहे? तर ती माहिती व ती बघण्याठी बॅटरी असणं. त्यातून सिमकार्ड काढलं तरी चालेल. हा एक समवाय संबंध. पण जर त्या फोनवरून बोलायचं असेल. संदेश पाठवायचे असतील तर त्याफोन मध्ये बॅटरीशिवाय सिमकार्ड अत्यावश्यक व ते चालू स्थितीतील असलं पाहिजे. शिवाय तो फोन नेटवर्क म्हणजेच तरंगांच्या सान्निध्यात असला पाहिजे. तरंग म्हणजेच आकाश. हा झाला दुसरा समवाय संबंध. त्यात अधिक माहिती साठवणारी मेमरी चिप असली काय नसली काय त्याने थोडी अडचण येईल अतिरिक्त माहिती झाल्यावर..पण फोन करणे, बोलणे बंद पडणार नाही म्हणून त्या मेमरी चिपशी समवाय संबंध नाही.”

“बरं पण विक्रमा हे सगळं तू सांगतोस खरं. पण या अभ्यासाला सुरुवात कुठून करायची?”

“वेताळा, पदार्थविज्ञान हा माणसांच्या जीवाभावाचा मित्र आहे. पण अतिपरिचयामुळे उपेक्षित आहे. माणूस पदार्थविज्ञान उठता बसता वापरतच असतो. वैशेषिकात ते सूत्रबद्ध केलंय इतकंच. 

प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय
गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे ||14||
To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.
फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात. गुण, कर्म, सामान्य, विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही गुण नसतात.

म्हणजेच पदार्थाच्या अभ्यासाची सुरुवात ही त्यातील द्रव्यांना हुडकून काढल्यावर सुरु होते. सैनिकाच्या उदाहरणात आधी त्याने तो लोखंडाचा गोळा असावा, पण त्याआधी तो स्थायू किंवा पृथ्वीद्रव्य आहे हे टणकपणावरून ओळखले. प्रथम पृथ्वीद्रव्य ओळखले. या द्रव्यालाच आता बाकीची अंगे म्हणजे गुण, कर्म,सामान्य वगैरे येऊन चिकटणार. उजाडमाळरानावर जसा अग्नि पसरू शकत नाही तसेच द्रव्यांशिवाय बाकीची अंगे शिरु नाहीत. म्हणून द्रव्य ओळखणे ही पहिली पायरी. तर अशी अभ्यासाची सुरुवात झाली”

“अभ्यासाची सुरुवात? अभ्यास म्हणजे कसं शास्त्रज्ञांनी करायची गोष्ट आहे. रणांगणावरचा सैनिक जीव वाचवणार का तुझ्या पदार्थाचा अभ्यास करायला वह्या पुस्तक घेऊन बसणार?”

“अरे वेताळा, अभ्यास किंवा सतत मनन, चिंतन, आकलन करणं हा माणसाचा नैसर्गिक कल आहे. ते त्याच्याकडून सहजच होतं..श्वासोच्छवासासारखं..आता मी श्वास घेतो असं तो ठरवून घेत नाही. तसंच आता मी अभ्यास करतो असं तो ठरवत नाही. त्याचे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ ही त्याची इद्रिये कायम त्याच्या मेंदूला माहिती पुरवत असतात..ही पडद्यामागे सतत चालणारी प्रक्रीया आहे. तिला जेव्हा सजगपणे जाणतेपणाने माणूस करतो तेव्हा त्याला पदार्थाच्या धर्माचे आकलन किंवा ऋषी प्रशस्तपादांच्या भाषेत पदार्थधर्म..”

“अरे मानवांना ज्यात त्यात धर्म घुसवण्याची फार हौस..असो..मलाही कळतंय की धर्म म्हणजे त्या पदार्थाची असण्याची व वागण्याची विशिष्ट पद्धत..बर तर सैनिकाला पृथ्वीद्रव्य कळलं..आता पुढे सांग..”

“वेताळा इंद्रियांद्वारे जाणवणारी द्रव्ये..म्हणजे या लोहगोळ्याच्या बाबतीत पृथ्वी व त्याचा गरमपणामुळे कळणारे तेज हे द्रव्य कळल्यावर त्याच्या गुण म्हणजे रंग, रूप इत्यादि गुणांचा अभ्यास, मग त्याचे कर्म म्हणजे हालचाल कशी होते हा अभ्यास करायचा. त्यानंतर सामान्य अंग म्हणजे ते द्रव्य कोणत्या गटात मोडते म्हणजे लोखंड हे धातूंच्या गटात मोडते हे कळते. आता गट पाहिल्यावर मग त्या गटातील म्हणजे इतर धातूंपेक्षा ते वेगळे कसे आहे याचा अभ्यास करायचा. त्यासाठी त्या लोखंडाचे लहानात लहान कण केल्यानंतरही काय शिल्लक उरते ते  पाहायचे. लोखंडाच्या बाबतीत त्याचा अणू उरतो. तांब्याच्या अणूपेक्षा तो वेगळा असतो. हे झाले विशेष अंग. मग हे पाहिल्यानंतर ते विशेष असल्यानेच त्या पदार्थाला अर्थ येतो व नसल्यास तो पदार्थच नष्ट होतो का ते पाहायचे. लोखंडाचा प्रत्येक अणू दाटीवाटीने त्या गोळ्यात बसलेला आहे. ते अणू गेले तर तो गोळाच नष्ट होईल. म्हणून त्या लोखंडाच्या अणूचा व त्या गोळ्याचा अतूट किंवा समवाय संबंध आहे. शिवाय त्यातील तेजाचा म्हणजेच उष्णतेचा त्याच्या तापमानाशी अतूट संबंध आहे. तेज गेले की तापमान गेले. म्हणून तेजाचा व तापमानाचा अतूट संबंध आहे.”

“कळला रे अतूट संबंध. पण मला सांग की ही अनेक द्रव्ये एखाद्या पदार्थात असू शकतात. तू म्हटलास तसं तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात तेजातील बदलामुळे लोखंडाचे गुण बदलतात. मग मला सांग की यात पदार्थाची कोणकोणती अंगे बदलतात? या बदलाला काय म्हणतात?”

“वेताळा, या बदलाला भौतिक बदल म्हणतात. प्रशस्तपाद म्हणतात
कारणत्वञ्चान्यत्र पारिमाण्डल्यादिभ्य: ||17 ||
The quality of being the cause belongs to all (substances, qualities and actions) except the atomic measure.
दुसऱ्या कशालातरी कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.

“कसं कोड्यात बोलल्यासारखं वाटतंय. कारण होणे म्हणजे रे काय?”

“म्हणजे असं बघ वेताळा, पाणी आहे आणि ते विशिष्ट कक्ष तापमानाला आहे. त्याचा स्पर्शगुण (temperature) आपण समजा ३८ अंशांपासून १०० अंशांपर्यंत वाढवत नेला तर त्यातलं पाणी वाफेत परिवर्तित होईल. म्हणजे आप द्रव्यापासून वायू द्रव्यापर्यंतचा बदल. तेच तापमान ० अंशापर्यंत खाली आणलं तर बर्फ म्हणजेच पृथ्वी द्रव्यात रुपांतर. पण तरीही पाण्याचा विशेष रेणू हा पाण्याचा विशेष रेणूच राहिला. जो पर्यंत पाण्याचा रेणू हा तिथे कायम आहे तो पर्यंत तो भौतिकबदल(physical change). जर काही कारणाने जर तो रेणू दुसऱ्या कशाततरी बदलला तर मात्र त्या द्रव्याचे व पर्यायाने पदार्थाचेच अस्तित्त्व संपते तो होतो रासायनिक बदल(chemical change).”

“काय रे विक्रमा एकाच विषयात किती विषय घुसवतोस..किती फाटे फोडतोस..पण आता या क्षणी मात्र मला गेलं पाहिजे. वैशेषिकात म्हटलंय तसं काल द्रव्य फार चंचल आहे व आताचा काळ सांगतोय की मला परत गेलंच पाहिजे. पुन्हा येईनच मी विक्रमा या भौतिकबदलांविषयी बोलायला..तोपर्यंत विचार करुन ठेव. चांगली चांगली उदाहरणं शोधून ठेव. येतो मी विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ”

विक्रमा भोवतीचं जग त्या काळापुरतं तरी विखुरलं. प्रजाजन झोपी गेले. किर्र अंधार झाला. चंद्र पेंगुळला. सारथी मनातल्या मनात विचार करत राहिला की हे चंद्रकला दिसणं..वाढत जाणं..कमी होत जाणं हा कसला बसल असावा बरे..पदार्थविज्ञान गुरुंना विचारलं पाहिजे..

(क्रमश:)

मूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

Saturday, 16 December 2017

सारांश: पदार्थाच्या सहा अंगांमधील साम्य व भेद स्थळे (Summary Table : Comparative analysis of the six facets of Padarthas)

खालील सारणीमध्ये सारांशरूपात पदार्थाच्या सहा अंगांमधील साम्यस्थळे व भेदस्थळे अनुक्रमे हिरव्या व लाल रंगांनी दर्शविण्यात आली आहेत.

साम्य/भेद
द्रव्य
(substance)
गुण
(
properties)
कर्म
(
Action)
सामान्य (classification)
विशेष (individuality)
समवाय
(
inherence)
अस्तित्त्व (being ness)






व्यक्त करता येणे (predicability)






जाणून घेता येणे (cognizability)






समवायित्व (Inherability)






अनेकत्व (Plurality)






गुण (Properties)






कर्म (Actions)






सत्ता सम्बन्ध (Relationship with being)






सामान्यत्व (Classification)






विशेषत्व (Individuality)






स्वसमयार्थभिधेयत्व (Denoted by the word Arth)






धर्मकर्तुत्त्व (Cause of virtue)






अधर्मकर्तुत्त्व (Cause of vice)






कार्य्यत्व (character of being an effect)






अनित्यत्त्व (non-eternal)






कारणत्त्व
(
quality of being the cause)    






द्रव्याश्रितत्व (quality of depending upon a substance)






स्वात्मसत्त्वम् (have sole being in themselves)






बुद्धिलक्षणत्वम् अकार्य्यत्वम् (cognitive faculty as sole indicator of not being an effect)






अकारणत्त्वम् (not being the cause)






अविशेषवत्त्वम् (having no particular generality)






नित्यत्त्वम् (being eternal)






अर्थशब्दानभिधेयत्त्वम् (not being expressed by word Arth)